breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

प्रवाशांना खुशखबर! पश्चिम रेल्वेवर आता धावणार ५०० लोकल फेऱ्या

मुंबई – अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू असली तरीही लोकल फेऱ्या कमी पडत आहेत. पश्चिम रेल्वेवर दररोद ३५० विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातात. मात्र, तरीही गर्दी होत असल्याने पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ५०० लोकल फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी लोकलचा प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सरकारी आस्थापनांमध्ये काम करणारे आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या विशेष फेऱ्या सोडण्यात याव्यात, अशी विनंती महाराष्ट्र सरकार सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे करत होतं. त्या मागणीची दखल घेऊन पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवर सध्या विशेष लोकल चालवल्या जात आहेत. या लोकलसेवेमुळे खूप मोठा दिलासा प्रवाशांना मिळत आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने सध्या ज्या विशेष लोकल धावत आहेत त्या कमीच पडत आहेत. प्रामुख्याने पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी आणि सायंकाळी विशेष लोकलमध्ये मोठी गर्दी उसळते. ही बाब लक्षात घेऊन ही गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या दररोज साडेतीनशे विशेष लोकल धावतात. मात्र, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन व्हावे व गाड्यांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून विशेष लोकलची संख्या ३५० वरून आता ५०० करण्याचा निर्णय झाला आहे. सोमवार म्हणजेच २१ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाढीव दीडशे लोकलपैकी ३० लोकल सकाळी गर्दीच्या वेळेत तर २९ लोकल संध्याकाळी गर्दीच्या वेळेत चालवल्या जाणार आहेत. प्रामुख्याने गर्दीच्या वेळी प्रवास सुसह्य व्हावा, हा हेतु डोळ्यापुढे ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगबाबतचे नियम पाळावेत तसेच प्रवास करताना मास्क वापरावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे. या विशेष लोकल केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच चालवल्या जात असून त्याशिवाय कुणालाही या लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे पुन्हा एकदा नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान,सामान्य प्रवाशांसाठी सध्या लोकलचे दरवाजे बंद आहेत. १ सप्टेंबरपासून नवी नियमावली लागू होत असताना मुंबईतील लोकलसेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी चर्चा होती मात्र राज्य सरकारने त्याबाबत कोणतीही उत्सुकता दाखवली नाही. मुंबई व आसपासच्या उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार लोकलसेवा पूर्ववत सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी करेल अशी शक्यता तूर्त तरी दिसत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button