breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी टाकला ‘डाव’; भाजपाच्या दोन्ही आमदारांवर ‘घाव’

पिंपरी-चिंचवड उपमहापौरपदासाठी केशव घोळवे यांना संधी?

नेत्या पंकजा मुंडे यांचाही शहरातील राजकारणात वाढता हस्तक्षेप

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत सत्ताधारी भाजपाच्या प्रदेश नेत्यांचा स्थानिक राजकारणात हस्तक्षेप वाढला आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत जुन्या गटामधून नगरसेवक केशव घोळवे यांचे नाव निश्चित करण्याबाबत थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नेत्या पंकजा मुंडे यांनी सूचना केल्यामुळे भाजपाचे ‘राम-लक्ष्मण’अर्थात आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना आपल्या इच्छुक समर्थकांना मुरड घालावी लागणार आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये एक वर्ष- एक नगरसेवक- एक पद असे सूत्र राबवले जात आहे. त्यानुसार अधिकाधिक नगरसेवकांना विविध पदांवर संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विशेष म्हणजे, पदांच्या वाटपामध्ये हक्काचा ‘वाटा’मिळवण्यासाठी जुना, भाऊसमर्थक, दादा समर्थक असे गट आपआपल्या परीने प्रयत्न करीत असतात, ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, जुन्या गटातील काही कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे ‘फिल्डिंग’लावली. नगरसेवक केश व घोळवे  यांचे नाव उपमहापौरपदासाठी ‘फायनल’ करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपामधील  विश्वसनीय सूत्रांनी दिली.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी उद्या (दि.२ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. दि. ६ नोव्हेंबर रोजी निकाल घोषीत करण्यात येईल. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी नियुक्ती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे.

रज्यात ज्या प्रमाणे शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेत जुना गट- भाऊसमर्थक आणि दादा समर्थक असे तिघांचे मिळून ‘सरकार’आहे, हे नाकारता येणार नाही. आता उपमहापौरपदाच्या रस्सीखेचमध्ये भाऊ-दादा यांच्यापेक्षा जुना गट सरस ठरताना दिसत आहे. वास्तविक, उद्या जोपर्यंत उमेदवारी अर्ज भरला जात नाही, तोपर्यंत आणखी काय चित्र समोर येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चंद्रकांत पाटील यांचा हस्तक्षेप; आमदारांची डोकेदुखी…

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने काम करणारे विद्यमान शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या हस्तक्षेपामुळे डोकेदुखी झाली आहे. लांडगे आणि जगताप दोघेही आपआपल्या समर्थक नगरसेवकांना समान संधी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे, जुन्या गटातील नगरसेवकांनाही मानाच्या पदांवर संधी देण्यात आली आहे. मात्र, प्रदेशपातळीवरील हस्तक्षेपामुळे स्थानिक नगरसेवकांना दिलेला ‘शब्द’पाळता येत नाही, असा सूर दोन्ही आमदारांच्या निकटवर्तींचा आहे.

घोळवेंसाठी पंकजा मुंडे यांचीही शिफासर?

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यात पक्ष सत्तेत आल्यानंतर (२०१४) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्षपदी सदाशीव खाडे यांना संधी दिली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांचे समर्थक असलेल्या नामदेव ढाके यांनाही सभागृहपदी संधी मिळाली आहे. तत्त्पूर्वी, नितीन गडकरी यांचे निकटवर्ती असलेल्या एकनाथ पवार यांना सभागृह नेता म्हणून संधी मिळाली होती. आता खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यामुळे शहरातील जुन्या गटातील काहीजण अस्वस्थ झाले आहेत. त्यातच आता केशव घोळवे यांच्या नावासाठी थेट पंकजा मुंडे यांनी शिफारस केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

आमदारांना पडला प्रश्न, कमिटमेंटचे काय?

भाजपाचे स्थानिक नेते आमदार लांडगे आणि जगताप यांना आता प्रश्न पडला आहे. ज्या नगरसेवकांना आपण ‘शब्द’अर्थात कमिटमेंट दिली होती. त्यांना काय खुलासा करायचा? असा प्रश्न आमदार द्वयीला पडला आहे. आमदार लांडगे समर्थक असलेल्या  नगरसेवक वसंत बोराटे,  भाऊसमर्थक असलेल्या नगरसेविका हिरानानी घुले आणि ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांच्या समर्थक असलेल्या नगरसेविका आशा शेंडगे यांना त्या-त्या नेत्यांनी ‘कमिटमेंट’दिली होती. पण, प्रदेशपातळीवर निर्णयामुळे सर्वांनाच ‘बॅकफूट’वर यावे लागले, असे दिसते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button