breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पोलिसांची सलग सागरी गस्त शक्य!

नव्या चार मौठय़ा नौका लवकरच ताफ्यात

मुंबईवरील दहशतवादी हल्लय़ाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता कुठे सलग सागरी गस्त घालणे राज्य पोलिसांना शक्य होणार आहे. हल्लय़ाची दशकपूर्ती होण्याआधी गेल्या महिन्यात पोलिसांसाठी चार मोठय़ा नौका भाडय़ाने घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्लय़ानंतर माजी केंद्रीय गृहसचिव माधव प्रधान यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशींमध्ये सागरी गस्त सक्षम करण्यावर भर होता. परंतु या हल्लय़ाला दहा वर्षे पूर्ण होत आली तरी सागरी गस्तीच्या परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नव्हती. सागरी गस्तीसाठी सध्या उपलब्ध असलेल्या नौका सलग पाच तासापेक्षा अधिक गस्त घालू शकत नसल्याने कुचकामी ठरल्या होत्या. समुद्रात किमान आठवडाभर तळ ठोकून बसेल, अशा नौकेची गरज होती. त्यामुळे अशा नौका भाडय़ाने घेण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविण्यात आला होता. अशा चार नौका भाडय़ाने घेण्याचा प्रस्ताव ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात मंजूर झाल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले.

राज्याला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून मुंबईवरील हल्लय़ानंतर सागरी सुरक्षेतील त्रुटी बाहेर आल्या होत्या. त्यामुळेच सागरी सुरक्षा हे महानिरीक्षक दर्जाचे नवे पद निर्माण करण्यात आले. सागरी सुरक्षा व्यवस्था कशी असावी, याचा आढावा या विभागावर सोपविण्यात आला होता. या विभागाने अलीकडे सागरी सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या स्पीड बोटी कशा कुचकामी आहेत याकडे लक्ष वेधत सलग सागरी गस्तीसाठी ‘इंटरमेडिएट सपोर्ट वेसल्स’(आयएसव्ही) या मोठय़ा नौका आवश्यक असून त्या  तात्काळ भाडय़ाने घेणे आवश्यक असल्याचे नमूद करीत पोलीस महासंचालकांमार्फत गृहखात्याकडे प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंजुरी दिली आहे. अशा चार नौका पोलिसांच्या ताफ्यात लवकरच येणार आहेत. या नौका भाडय़ाने घेण्यात येणार असल्यामुळे  देखभालीचा खर्चही नौका पुरविणाऱ्या कंपनीवर राहिल. तेल व नैसर्गिक वायू महामंडळानेही अशी नौका भाडय़ाने घेतली आहे, याकडे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button