breaking-newsराष्ट्रिय

पोटनिवडणुकांमध्ये भाजपला जोर का झटका

नवी दिल्ली – देशाच्या विविध भागांत आज झालेल्या लोकसभा आणि विधानसभा जागांसाठीच्या पोटनिवडणुकांत केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला जोर का झटका बसला. लोकसभा आणि विधानसभा मिळून 14 जागांवर पोटनिवडणुका झाल्या. त्यातील 11 जागा विरोधकांनी खिशात घातल्या. तर अवघ्या 3 जागांवर भाजप आणि मित्रपक्षांना समाधान मानावे लागले. अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोटनिवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या प्रत्येक जागेला प्रचंड महत्व प्राप्त झाले होते. या पोटनिवडणुकांत विरोधकांची झालेली सरशी भाजपच्या गोटातील चिंता वाढवणारी आहे.

पणाला लागलेल्या राजकीय प्रतिष्ठेचा विचार करता राजकीयदृष्ट्या सर्वांत मोठे राज्य असणाऱ्या उत्तरप्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सर्वांत हाय-प्रोफाईल मानली जात होती. त्या जागेवर राष्ट्रीय लोक दलाच्या (रालोद) उमेदवार तबस्सुम हसन यांनी बाजी मारली. विरोधकांनी ऐक्‍याचे दर्शन घडवत ती जागा भाजपकडून खेचून घेतली. भाजपला महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या रूपाने लोकसभेची आणखी एक जागा गमवावी लागली. ती जागा जिंकत राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभेतील आपले संख्याबळ एकने वाढवले.

महाराष्ट्रातील पालघर लोकसभेची जागा स्वत:कडे राखण्यात आलेले यश भाजपला थोडाफार दिलासा देणारे ठरले. नागालॅंडमधील पोटनिवडणुकीत लोकसभेची एकमेव जागा एनडीपीपी या भाजपच्या मित्रपक्षाने जिंकली. एकंदर, लोकसभा पोटनिवडणुकांत भाजपला स्वत:च्या ताब्यात असलेल्या 3 पैकी 2 जागा गमवाव्या लागल्या.
देशाच्या 11 राज्यांत लोकसभा आणि विधानसभा मिळून 14 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. विधानसभा जागांसाठीच्या पोटनिवडणुकांत तर भाजपला बसलेला हादरा आणखीच तीव्र ठरला.

विधानसभांच्या 10 जागांपैकी केवळ एका जागेवर (उत्तराखंड) भाजपला विजय मिळवता आला. विधानसभांच्या 3 जागांवर (कर्नाटक, पंजाब आणि मेघालय) कॉंग्रेसने बाजी मारली. तर 6 जागा उर्वरित पक्षांना मिळाल्या. झारखंडमध्ये झामुमोने 2 तर केरळ, उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्‍चिम बंगालमध्ये अनुक्रमे माकप, सप, राजद आणि तृणमूल कॉंग्रेसने प्रत्येकी 1 जागा जिंकली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button