breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पेशवाईचे प्रतिक ‘पुणेरी पगडी’ नाकारली; यापुढे केवळ ‘फुले पगडी’नेच सन्मान!

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश
  • पुण्यातील वर्धापन दिन कार्यक्रमात भाजप सरकारवर ‘हल्लाबोल’

पुणे। (विशेष प्रतिनिधी)- पेशवाईचे प्रतिक असलेली ‘पुणेरी पगडी’ आम्ही झुगारली असून, समतेचा संदेश देणा-या महात्मा फुले यांची ओळख असलेली ‘फुले पगडी’ हाच आमचा सन्मान आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली.

यापुढे आमचा पुणेरी पगडीने सन्मान करायचा नाही, जी पगडी मी आता तुम्हाला दाखवणार…तीच पगडी घालून आमचे स्वागत करा, असे स्पष्ट आदेश पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यानंतर ओबसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांचा ‘फुले पगडी’ घालून सन्मान करण्यात आला. त्यामुळे सभास्थळावर उपस्थित असलेल्या ‘ओबीसी’ बांधवांनी गगणभेदी जल्लोष केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिन आणि पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल सभेच्या समारोप पुण्यात झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते.

यावेळी आयोजकांनी पवार आणि भुजबळ यांचा सन्मान पुणेरी पगडी देवून केला. मात्र, पवार यांनी सत्काराबाबत नाराजी दाखवली. आम्हाला यापुढे ‘पुणेरी पगडी’ नको, फुले पगडी हवी आहे, असे स्पष्ट केले. तसेच, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फुले पगडी घालून पुन्हा सन्मान केला. त्यामुळे समाजाला समतेचा संदेश देणा-या महात्मा फुले यांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला, अशी चर्चा बहुजन समाजात सुरू झाली आहे.

‘ओबीसी’ समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी अडीच वर्षांचा कारावास भोगला. त्यानंतर पहिल्यांदाच भुजबळ जाहीर सभेत भाषणाला उभे राहिले. महात्मा फुले यांनी आयुष्यभर समतेचा संदेश दिला. महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. अशा महात्मा फुलेंच्या विचाराने वाटचाल करणारा महाराष्ट्रात पेशवाईमुळे बहुजन समाजाला तुच्छतेची वागणूक मिळाली. तरीही आपण पेशवाईचे प्रतिक असलेली पुणेरी पगडी डोक्यावर मिरवायची का? असा अप्रत्यक्ष सवालच शरद पवार यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांच्या यांच्या या भूमिकेमुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. मात्र, ब्राह्मण समाजाचे वर्चस्व असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. देशात आणि राज्यात दलित समाजातील, बहुजन समाजातील नागरिकांवर अत्याचार होत आहेत. भीमा कोरेगाव सारख्या घटनांमुळे राज्यात असंतोष निर्माण झाला आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर अशी दुही निर्माण झाली, असून राज्यातील एकात्मतेचा बाधा निर्माण होवू लागली आहे. समाजा-समाजात तेढ निर्माण झाल्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी पेशवाईचे प्रतिक असलेली ‘पुणेरी पगडी’ झुगारुन लावली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ट्ट्वीटर’ द्वारे शरद पवार यांना प्रत्त्युत्तर दिले आहे. पवार यांनी देशाचे राजकारण करावे, द्वेशाचे नको, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला आहे.

—-

राज्यातील ‘ओबीसी’ समाज एकवटला…

‘पुणेरी पगडी’ला विरोध करीत पेशवाईचे सरकार घालवण्याचे संकेत  शरद पवार यांनी दिले. विशेष म्हणजे, ‘ओबीसी’ समाजातील दिग्गज नेते छगन भुजबळ यांचा गौरव ‘फुले पगडी’ घालून सन्मान केला. त्यानंतर भुजबळ यांनीही संपूर्ण ‘ओबीसी’ समाजाला सोबत घेवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी रस्त्यावर उतरणार आहे, अशी गर्जाना केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुसंख्य असलेला मराठा व ओबीसी समाज एकवटल्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता हस्तगत करण्यास यशस्वी होईल, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

—-

ॲड. वंदना चव्‍हाण, संजोग वाघेरे यांचे कान टोचले…

पुण्याच्या शहराध्यक्षा ॲड. वंदना चव्‍हाण आणि पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यावर पुण्यातील वर्धापन दिन कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी होती. त्यांनी कार्यक्रम उल्लेखनीय केला. मात्र, सन्मान सोहळ्यात गफलत केली. सभा महात्मा फुले नगर येथे आयोजित केली. मात्र, सन्मानसाठी पुणेरी पगडी आणली. त्यामुळे नाराज झालेल्या शरद पवार यांनी स्वत: ‘फुले पगडी’ आणण्यास सांगितले. भाषणाला उभे राहिल्यानंतर पवार यांनी छगन भुजबळ यांचा सन्मान नव्याने ‘फुले पगडी’ घालून केला. समतेचा संदेश देणा-या महात्मा फुले यांचे खऱ्या अर्थाने स्मरण यावेळी उपस्थित श्रोत्यांना झाले. यावेळी ॲड. चव्‍हाण आणि वाघेरे या दोघांचेही पवार यांनी कान टोचले. यापुढे आमचा सन्मान हा ‘फुले पगडी’ घालूनच झाला पाहिजे, असे आदेशही दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button