breaking-newsराष्ट्रिय

पेट्रोल 25 रूपयांनी स्वस्त होऊ शकते पण केंद्र सरकार ते करणार नाही – चिदंबरम

नवी दिल्ली – देशातील पेट्रोलचे दर सध्याच्या परिस्थितीतही 25 रूपयांनी कमी होऊ शकतात पण सरकार ते करणार नाही असे मत माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे. या संबंधात त्यांनी ट्विटरवर तपशीलाने विवेचन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की सरकार प्रत्येक लिटर मागे लोकांचे 25 रूपये जादाचे काढून घेत आहे. हे लोकांचे पैसे आहेत ते त्यांना परत मिळाले पाहिजेत हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतीनुसार प्रतिलिटर सरकार 15 रूपयांचा फायदा काढून घेते आणि त्यावर पुन्हा प्रतिलिटर 10 रूपयांचा अतिरीक्त कर लावला जातो. हे मागे घेऊन सरकारला 25 रूपयांनी पेट्रोल स्वस्त करणे सहजशक्‍य आहे. पण ते हे करणार नाहीत.

लोकांची फारच ओरड झाली तर एक दोन रूपयांची कपात करून ते लोकांना फसवण्याचेच काम करतील असे मतही चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या काळात 19 दिवस पेट्रोल आणि डिजेलची दरवाढ रोखून धरण्यात आली होती पण आता रोजच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असून आता तर ते विक्रमी पातळीवर गेले आहेत. सध्याच्या दराने केंद्र सरकार पेट्रोलवर 19 रूपये 48 पैसे इतके उत्पादन शुल्क लागू करीत असून डिझेलवर 15 रूपये 33 पैसे दराने उत्पादन शुल्क लागू केले जात आहे. त्याखेरीज राज्यांकडूनही भरमसाठ व्हॅट लागू केला जात आहे. तो प्रत्येक राज्यात वेगळा आहे. पेट्रोल व डिझेल वर एक रूपयांचा उत्पादन शुल्क कमी केले तर सरकारला तेरा हजार कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागते.

सरकारने नोव्हेंबर 2014 पासून आत्ता पर्यंत नऊ वेळा उत्पादन शुल्क वाढ केली आहे. या उत्पादन शुल्क वाढीमुळे सरकारला मागील आर्थिक वर्षात तब्बल 2 लाख 42 हजार कोटी रूपयांचा जादाचा महसुल मिळाला होता. मोदी सरकारच्या काळात मध्यंतरी तर कच्चा तेलाच्या किंमती 22 डॉलर्स पर्यंत खाली आल्या होत्या. मनमोहनसिंग सरकारच्या काळात या किंमती 142 डॉलर्स पर्यंत वर गेल्या होत्या. तरीही त्या काळात आजच्या तुलनेत खूपच स्वस्त दरात पेट्रोल मिळत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button