पेट्रोल आणि डिझेल कडाडले मुंबईत पेट्रोलची नव्वदी पार
नवी दिल्ली – अगोदरच उच्चांकी पातळीवर गेलेल्या इंधनाच्या दरात २९ दिवसानंतर आज पुन्हा दरवाढ झाली. त्यात पेट्रोल लिटरमागे २१ ते २४ पैशांनी आणि डिझेल २६ ते २९ पैशांनी महागले आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलने नव्वदी पार केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे भारतातही इंधन दरवाढ होत आहे. ती आता सर्वोच्च पातळीवर गेल्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असताना २९ दिवसांपासून स्थिर असलेल्या इंधनाच्या दरात आज पुन्हा वाढ झाली. त्यामुळे दिल्लीत आजचा पेट्रोलचा दर ८४ रुपये २० पैसे लिटर, तर डिझेल ७४ रुपये ३८ पैसे लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल ९० रुपये ८३ पैसे लिटर आणि डिझेल ८१ रुपये ७ पैसे लिटर झाले आहे. चेन्नईत पेट्रोल ८६ रूपये ९६ पैसे आणि डिझेल ७९ रुपये ७२ पैसे लिटर तर कोलकात्यात पेट्रोल ८५ रुपये ६८ पैसे आणि डिझेल ७७ रुपये ९७ पैसे लिटर झाले आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.