breaking-newsराष्ट्रिय

पुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन

श्रीनगर : पाकिस्तानी लष्कर व त्यांची आयएसआय ही गुप्तचर संघटना पुलवामाच्या हल्ल्यात सामील असल्याचा आरोप लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लन यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. काश्मीरमध्ये बंदूक उचलून कारवाया करणाऱ्या कुणाही व्यक्तीने शरणागती पत्करली नाही तर त्याला संपवले जाईल, असा इशारही त्यांनी दिला आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद  झाल्यानंतर १०० तासांत आम्ही जैश ए महंमदच्या म्होरक्यांना ठार मारले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक एस. पी. पणी व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक झुल्फिकार हसन या वेळी उपस्थित होते.

सोमवारच्या सोळा तासांच्या लष्करी कारवाईत दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात पिंगलान येथे जैशचे तीन दहशतवादी मारले गेले असून, या कारवाईत लष्कराचे एक मेजर व इतर चार जवान शहीद झाले आहेत.

ढिल्लन यांनी सांगितले, की पाकिस्तान लष्कर व आयएसआय यांच्या वतीनेच जैश ए महंमद दहशतवादी कारवाया करीत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा शंभर टक्के सहभाग आहे याची आम्हाला खात्री आहे. ज्या आईवडिलांची मुले दहशतवादाकडे वळत आहेत त्यांनी त्यांचे मतपरिवर्तन करावे व शरणागती पत्करण्यास भाग पाडावे अन्यथा त्यांनी मृत्यूला सामोरे जाण्यास तयार राहावे. काश्मीरमध्ये जो कुणी बंदूक उचलेल व शरणागती पत्करणार नाही त्याला नष्ट केले जाईल.

सोमवारच्या कारवाईबाबत त्यांनी सांगितले, की काश्मीर खोऱ्यातील जैशचा म्होरक्या कामरान याच्यासह इतर तीन दहशतवादी त्यात ठार झाले. पुलवामा हल्ल्यानंतर शंभर तासांत आम्ही ही कारवाई करून जैशचे कंबरडे मोडले आहे.

पुलवामातील हल्ला जैशनेच केला असून त्या गटाचे नियंत्रण आयएसआय व पाकिस्तानी लष्कराच्या हातात आहे. त्यांचे स्थानिक कमांडर्स हे पाकिस्तानी आहेत, तेच हल्ल्यांचे नियंत्रण व समन्वय करीत आहेत. गेल्या आठवडय़ात आत्मघाती तरुणाने स्फोटकांनी भरलेली मोटार सीआरपीएफच्या वाहनांवर आदळवून केलेला हल्ला काश्मीरसाठी अशा प्रकारचा पहिलाच हल्ला होता. इतक्या तीव्रतेने हल्ला कधीच झाला नव्हता. सीरिया, अफगाणिस्तान व पाकिस्तानात जसे हल्ले झाले तसाच हा प्रकार होता. दहशतवाद्यांनी आता हल्ल्याची ही नवी पद्धत सुरू केल्याने आम्ही सर्व प्रकारच्या पद्धतींना सामोरे जाण्याचे पर्याय खुले ठेवले आहेत.

काश्मीर खोऱ्यातील आताच्या कारवाईत जैशचा दहशतवादी गाझी अब्दुल रशीद हा मारला गेला काय असे विचारले असता त्यांनी सांगितले, की असे अनेक गाझी आले आणि गेले. यात नवीन काही नाही.

घुसखोरीबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, की सीमेवर बर्फ असून गेल्या काही महिन्यांत परिस्थिती प्रतिकूल असल्याने घुसखोरी कमी आहे, पण जम्मू मार्गाने पाकिस्तान घुसखोरांना पाठवत आहे. सांबा, पठाणकोट, हिरानगर भागातून त्यांना भारतात पाठवले जाते. पण गतकाळापेक्षा घुसखोरी कमी आहे. आता काश्मीरमध्ये कुणी घुसखोरी केली तर तो जिवंत परत जाणार नाही. काश्मीरमध्ये युवकांना मूलतत्त्ववादाचे धडे दिले जात आहेत. पण सरकार, लष्कर व इतरांच्या मदतीने ते रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील. दहशतवादी कारवाया करणाऱ्या युवकांसाठी सरकारने शरणागतीचे धोरण राबवले आहे, त्याचा लाभ घेऊन त्यांनी शरणागती पत्करावी. स्थानिक पातळीवर दहशतवादी गटात युवकांच्या भरतीचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button