breaking-newsराष्ट्रिय

पुलवामा हल्ला: कार आणि स्फोटकं पुरवणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान

दि. १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मुदस्सिर अहमद खान उर्फ मोहम्मद भाई याचा सुरक्षादलाबरोबर झालेल्या चकमकीत खात्मा झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सोमवारी एका चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यात जैश ए मोहम्मदचा दहशतवादी मुदस्सिर अहमद खानचा समावेश आहे.

सोमवारी रात्री त्राल येथील पिंगलिश परिसरात ही चकमक झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तीन दहशतवाद्यांमध्ये एक मुदस्सिर अहमद खान आहे. चकमकीत मारले गेलेले तिन्ही मृतदेह जळालेल्या अवस्थेत होते. त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.

गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी पिंगलिश परिसरात शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. शोध मोहिमेत दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर गोळीबार सुरु केला. सुरक्षादलानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

जैश ए मोहम्मदचा मुदस्सिर हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. २३ वर्षीय मुदस्सिर हा एक इलेक्ट्रिशन होता. त्याने पदवीही घेतली होती. दहशतवादी हल्ल्यात वापरण्यात आलेली कार आणि स्फोटकांची व्यवस्था त्यानेच केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्राल येथील मीर गल्लीत राहणारा मुदस्सिर २०१७ मध्ये जैश ए मोहम्मद संघटनेत कार्यकर्ता म्हणून सहभागी झाला होता. त्यानंतर नूर मोहम्मद तांत्रे उर्फ नूर त्रालीने त्याला जैशमध्ये सक्रिय करत जबाबदारी सोपवली होती.

डिसेंबर २०१७ मध्ये तांत्रेचा चकमकीत खात्मा झाल्यानंतर मुदस्सिर १४ जानेवारी २०१८ पासून फरार झाला होता. तेव्हापासूनच तो जैशच्या विविध कटात सक्रिय सहभाग नोंदवू लागला होता. पुलवामा हल्ल्यातील आत्मघातकी दहशतवादी आदिल अहमद डारच्या तो सातत्याने संपर्कात होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर आदळली होती.

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मुदस्सिरने आयटीआयमधून इलेक्ट्रिशनचा एक वर्षाचा डिप्लोमा केला होता. त्याचे वडील हे मजुरी करतात. फेब्रुवारी २०१८ मध्ये सुंजवा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही तो सहभागी होता. या हल्ल्यात सुरक्षादलाचे ६ जवान शहीद झाले होते. त्याचबरोबर एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता.

जानेवारी २०१८ मध्ये लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही त्याचे नाव समोर आले होते. या हल्ल्यात ५ सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्याचा तपास करत असलेल्या एनआयएच्या पथकाने २७ फेब्रुवारीला मुदस्सिरच्या घरावर छापा मारला होता.

पुलवामा हल्ल्यात वापरलेली मारूती इको ही मिनी व्हॅन जैशच्याच एका संशयिताने हल्ल्याच्या १० दिवस आधी खरेदी केली होती. संशयिताचे नाव दक्षिण काश्मीरमधील बिजबेहारा येथील सज्जाद बट असल्याचे समजते. हल्ल्यानंतर सज्जादही फरार असून तोही सक्रिय दहशतवादी बनला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button