breaking-newsराष्ट्रिय

पुलवामाचा हल्ला एकटय़ाचे काम नव्हे, तर गटाचे कृत्य

‘रॉ’चे माजी प्रमुख विक्रम सूद यांचे प्रतिपादन

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात सीआरपीएफच्या ४० जवानांचा बळी घेणारा दहशतवादी हल्ला हे कुणा एकटय़ाचे काम नव्हते, तर एखाद्या गटाचे कृत्य होते असे प्रतिपादन रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंगचे (रॉ) माजी प्रमुख विक्रम सूद यांनी रविवारी केले. या घटनेसाठी कुठे तरी सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीही जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुलवामा येथील संपूर्ण घटना हे कुणा एका व्यक्तीने केलेले काम नव्हते. त्यामागे एक संपूर्ण चमू असावा, असे ‘राष्ट्रीय सुरक्षेसाठी बाह्य़ गुप्तचर यंत्रणा’ या विषयावरील चर्चासत्रात सहभागी झाल्यानंतर सूद यांनी पत्रकारांना सांगितले.

सुरक्षा यंत्रणेत काही तरी त्रुटी असल्याशिवाय अशा प्रकारची घटना घडू शकत नाही.. त्या लोकांना सीआरपीएफच्या वाहनांच्या हालचालींबाबत माहिती होती. हा हल्ला करणारा लोकांचा एक गट असावा, असे सूद म्हणाले.

या घटनेवर भारताची प्रतिक्रिया कशी राहील, असे विचारले असता सूद यांनी सांगितले की, हा काही मुष्टियुद्धाचा सामना नाही. ठोशाला लगेच ठोशाने उत्तर देऊन काही साधणार नाही. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्युत्तराची वेळ आणि ठिकाण सुरक्षा दले ठरवतील, असे उत्तर सूद यांनी दिले.

जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला चीनचा पाठिंबा मिळत नसल्याबाबत विचारले असता सूद यांनी सांगितले, की चीन पाकिस्तानच्या विनंतीबरहुकूम वागत आहे. मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याच्या मुद्दय़ावर पाकिस्तानसाठी संयुक्त राष्ट्रसंघात चीन हा एकमेव रक्षक आहे.

यापूर्वी चर्चासत्रात बोलताना, पाकिस्तान भारताबद्दल जोपासत असलेला वैरभाव हा कायमस्वरूपी असल्याचे सूद यांनी सांगितले. तो कधीही नष्ट होणार नाही. कुठलीही शांतता बोलणी, कुठल्याही सवलती किंवा ‘मोठा भाऊ’ म्हणून वागणूक याचा काहीही उपयोग होणार नाही. आपल्याशी सद्भाव राखण्यात पाकिस्तानला स्वारस्य नाही. हे सर्व लक्षात घेऊनच आपल्याला धोरण आखावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. पाकिस्तान नव्हे, तर चीनचा आपल्याला अधिक मोठा धोका आहे. पाकिस्तानवर नियंत्रण ठेवून असलेला चीन हा तर आणखी वाईट आहे. आपल्याविरुद्ध चीनजवळ पाकिस्तान हे उपयुक्त माध्यम असून ते त्याचा वापर करतच राहतील. त्यामुळे आपल्याला उपाय योजावे लागतील असेही ते म्हणाले.

इस्रायल, पॅलेस्टाईनतर्फे निषेध, शोकसंवेदना

जेरुसलेम/ रामल्ला : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या ‘घृणित’ आणि ‘निंद्य’ दहशतवादी हल्ल्याचा इस्रायल व पॅलेस्टाईन या दोघांनीही निषेध केला असून, मृतांबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. या दु:खद हल्ल्यामुळे पॅलेस्टिनी लोकांना दु:ख झाले असून, या वेदनादायक प्रसंगी ते या दहशतवादी हल्ल्याबाबत निषेध व्यक्त करत आहेत, असे पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. तुम्ही, तुमचे लोक, तुमचे सरकार आणि बळी गेलेल्या लोकांचे कुटुंबीय यांच्याबद्दल आम्ही शोकसंवेदना व्यक्त करत आहोत. याप्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही महमूद यांनी या संदेशात म्हटले आहे. या ‘घृणास्पद’ हल्ल्यानंतर इस्रायल भारताच्या पाठीमागे उभा असल्याचे त्या देशाचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button