breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्याला पाणीपुरवठा करणारी पानशेत आणि खडकवासला धरणं भरली

पुणे |महाईन्यूज|

धरण क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. गुरुवारी दिवसभरात सुमारे ८५५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांतील चार प्रमुख धरणे ही सुमारे ९३ टक्के भरली असून, या धरणांमध्ये २७.१९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांपैकी पानशेत आणि खडकवासला ही दोन धरणे शंभर टक्के भरली आहेत. वरसगाव धरण हे सुमारे ९२ टक्के, तर टेमघर धरण हे सुमारे ७५ टक्के भरले आहे. दिवसभरात वरसगाव आणि

पानशेत धरण क्षेत्रांमध्ये प्रत्येकी नऊ मिलिमीटर पाऊस पडला. टेमघर धरण परिसरामध्ये ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरण क्षेत्रात मात्र पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर या परिसरात पाऊस पडला नाही.

पानशेत धरण हे भरले असल्याने या धरणातून ४२८३ क्युसेक वेगाने खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येत होते. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. दिवसभर या धरणातून खडकवासला धरणात सुमारे ९९० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणातून मुठा नदीत ९३९४ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. मात्र, दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने मुठा नदीत ८५५ क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

पवना परिसरात संततधार

पिंपरी चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात संततधार सुरू आहे. दिवसभरात २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हे धरण सुमारे 80 टक्के भरले आहे.

भाटघर धरण शंभर टक्के भरले

जिल्ह्यातील धरणांपैकी भाटघर धरण हे शंभर टक्के भरले आहे. या धरणात २३.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांपैकी कळमोडी, आंद्रा, गुंजवणी, भाटघर, वीर, नाझरे ही धरणे यापूर्वी शंभर टक्के भरली असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

उजनीत ३४ टीएमसी पाणीसाठा

सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. या धरणात सुमारे ३४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण सुमारे ६४ टक्के भरले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button