breaking-newsक्रिडा

पुण्यात जन्मलेल्या रोलबॉलच्या नावावर दोन विश्‍वविक्रमांची नोंद

सलग 24 तास रोलबॉल सामना खेळून “गिनीज बुक’मध्ये स्थान 
पुणे – काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मणिपूरपासून गुजरातपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यातील तीनशेहून अधिक खेळाडूंनी पुण्यात जन्मलेल्या रोलबॉल या आगळ्यावेगळ्या खेळाला गिनीज विश्‍वविक्रमांच्या पुस्तकात स्थान मिळवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय रोलबॉल महासंघ आणि भारतीय रोलबॉल महासंघ यांच्या प्रातिनिधिक संघांनी सलग चोवीस तास रोलबॉलचा सामना खेळून ही विश्‍वविक्रमी कामगिरी केली.

बेळगाव येथे झालेला रोलबॉलचा हा सामना जोरदार पावसाच्या सरी किंवा कडक ऊन यातील कशाचीही तमा न बाळगता देशभरातील 309 खेळाडूंनी सलग 24 तास रंगवला. महाराष्ट्रातील 42 मुले व 16 मुलींचा यात समावेश होता. या सामन्यात सर्वाधिक खेळांडूंचाही विश्वविक्रम नोंदवला गेल्यामुळे रोलबॉलच्या नावावर दोन विश्वविक्रमांची नोंद झाली.

संततधार पावसाच्या व्यत्ययानंतरही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या नियमानुसार सामना थांबवता येणार नसल्यामुळे पावसातही खेळाडूंनी खेळ सुरूच ठेवला. दुसऱ्या दिवशी दुपारी पडलेल्या कडक उन्हावरही खेळाडूंनी मात केली. भारतीय रोलबॉल महासंघाचे अध्यक्ष विनीत कुबेर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रोलबॉल या खेळाचा शोध लावणारे राजू दाभाडे व रोलबॉल प्रशिक्षक चेतन भांडवलकर या वेळी उपस्थित होते. या वेळी भांडवलकर यांच्या हस्ते विनीत कुबेर आणि राजू दाभाडे यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसकडून मिळालेले प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या विक्रमी सामन्यासाठी 309 खेळाडूंचा सहभाग असलेले आंतरराष्ट्रीय रोलबॉल महासंघ आणि भारतीय रोलबॉल महासंघ असे दोन संघ करण्यात आले आणि 18 मे रोजी सायंकाळी 5 पासून 19 मे रोजी सायंकाळी 5 पर्यंत सलग रोलबॉलचा सामना खेळला गेला. यात मुले व मुली अशा दोन्हींचा सहभाग होता. उन्हापावसात आणि रात्रीच्या वेळी लहान वयाच्या खेळाडूंना विश्रांती देऊन त्यांची जागा मोठ्या खेळाडूंनी घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत खेळ थांबू न देता विश्वविक्रमास गवसणी घातली. या सामन्यात ‘इंटरनॅशनल रोलबॉल फेडरेशन’ने’रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’वर 336-328 अशा गुणांनी मात केली.

विनीत कुबेर या वेळी म्हणाले की, ‘या विश्वविक्रमासाठी खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत अवर्णनीय असून लवकरच रोलबॉलला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळावे असा आमचा प्रयत्न आहे. गतवर्षीपासून रोलबॉलचा विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये समावेश झाला आहे. या वर्षी “प्रायॉरिटी सेक्‍टर’मध्ये या खेळाचा समावेश होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रोलबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल, असेही कुबेर यांनी सांगितले.

क्रीडा मार्गदर्शक राजू दाभाडे यांनी 2003 मध्ये या खेळाची संकल्पना मांडली आणि आता जगभरातील 50 हून अधिक देशांमध्ये हा खेळ खेळला जात आहे. रोलबॉल या खेळात खेळाडूंच्या कौशल्याबरोबरच त्यांचा वेग आणि शरीराचे संतुलन राखण्याची क्षमता या सर्वच गोष्टींचा कस लागतो. त्याबरोबरच या खेळात विजयासाठी टीम वर्क अत्यंत महत्त्वाचे ठरते, असे दाभाडे यांनी सांगितले.

बेळगावमध्ये नोंदवण्यात आलेल्या या विश्वविक्रमासाठीच्या सामन्यात 11 वर्षांखालील, 14 वर्षांखालील, 17 वर्षांखालील आणि त्याहून मोठ्या खेळाडूंचाही सहभाग होता. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्‍मीर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, तमिळनाडू, पॉंडिचेरी, केरळ, ओडिशा, आसाम या सर्व ठिकाणांहून रोलबॉल खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक आले होते. आयआरबीएफ आणि आरबीएफआय यांच्यातर्फे सर्व खेळाडूंचा सन्मानपदके प्रदान करून गौरव करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button