breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

पुण्यात कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमींच्या संख्येत वाढ, माजी महापौरांच्या निधनानंतर प्रशासनाला जाग

पुणे: कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अपुरी पडणारी पुण्यातील स्मशानभूमींची संख्या वाढवण्यात आली आहे. दोन स्मशानभूमींवरील वाढता ताण लक्षात घेत ही संख्या नऊवर नेण्यात आलेली आहे. पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जागा न मिळाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. पुण्यातील कोव्हिड रुग्णालयांनुसार स्मशानभूमीची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक स्मशानभूमीसाठी स्वतंत्र शववाहिकाही तैनात करण्यात आलेली आहे.

यापूर्वी केवळ कैलास आणि येरवडा स्मशानभूमीतच कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले जात होते. यापुढे या दोन स्मशानभूमींसह औंध, पाषाण, कात्रज, धनकवडी, मुंढवा, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी या स्मशानभूमींमध्येही अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कैलास आणि येरवडा स्मशानभूमीमध्ये 24 तास कोरोनाबाधित मृतांवर अंत्यविधी करता येणार आहेत. तर उर्वरित स्मशानभूमींमध्ये सकाळी 8 ते रात्री 12 या वेळेतच अंत्यसंस्कार होणार आहेत. यासोबतच कोरोनाव्यतिरीक्त अन्य मृतांचेही अंत्यसंस्कार पूर्वीप्रमाणेच 24 तास सुरु राहणार आहेत.

दत्ता एकबोटे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक रुग्णालयांकडे विचारपूस केली गेली, मात्र बेड उपलब्ध होऊ शकला नाही. अखेर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनमध्ये योग्य उपचार व्हावेत, यासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट, पालकमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर सुविधा मिळाल्या, परंतु तोपर्यंत एकबोटे यांची प्रकृती खालवली होती. मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार इतक्यावर थांबले नाहीत. एकबोटे यांच्या अंत्यसंस्कारातही अनेक अडचणी आल्या. आधी त्यांचे पार्थिव कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले, मात्र तिथे जागा नसल्याने त्यांना येरवड्याला नेण्यात आलं होत. तिथून पुन्हा कोरेगाव पार्क स्मशानभूमीत नेऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button