ताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील कचरा प्रकल्पांचे होणार ‘ऑडिट’; महापालिका प्रशासनाचा निर्णय

प्रशासनाची माहिती; मगच नव्या प्रकल्पांची उभारणी

पुणे – शहरात नव्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याआधी अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांचे ‘ऑडिट’ करण्यात येणार आहे. प्रामुख्याने प्रकल्पांची क्षमता, त्यांची उभारणी, त्याकरिता वापरलेली यंत्रसामग्री आणि त्यावरील खर्च यांचा अभ्यास केला जाणार असून, नेमक्‍या क्षमतेचे प्रकल्प उभारण्यासाठी त्याची मदत होईल. त्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन आणि इतर संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

शहरात सध्या रोज १६०० ते १७०० टन कचरा जमा होत असून, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या विविध भागांत एक हजार टनापेक्षा अधिक कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात आले असून, त्यावर गेल्या आठ वर्षांत ४० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. त्यातील मोठ्या क्षमतेचे प्रकल्प बंद आहेत, तर अन्य प्रकल्पांमध्ये क्षमतेपेक्षा कमी कचऱ्यावर प्रक्रिया होते. फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्याने गेल्या आठवडाभरापासून कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर ५० ते १०० टन क्षमतेच्या प्रकल्पांमध्ये कचरा नेला जात आहे. रामटेकडी आणि वडगाव (बु) येथील कचरा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.

कचरा प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही ते चालत नसल्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवले आहे. कचऱ्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली. या पार्श्‍वभूमीवर सध्या सुरू असलेल्या छोट्या-मोठ्या क्षमतेच्या प्रकल्पांची तज्ज्ञांमार्फत पाहणी करून त्यातील नेमक्‍या त्रुटी शोधण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रकल्पांमध्ये बदल करून त्यांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न असेल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

हंजर आणि दिशा प्रकल्प बंद आहेत. अन्य १९ प्रकल्प त्यांच्या क्षमतेनुसार कार्यान्वित आहेत. नव्याने काही प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. सर्वसाधारण सभेतील चर्चेनुसार प्रकल्पांचे ‘ऑडिट’ करण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रकल्पांची व्याप्ती वाढेल.
– सुरेश जगताप, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button