breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुणे विद्यापीठाचे निकाल वेळेत होणार जाहीर!

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वेळेत निकाल लागण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यासाठी समिती स्थापन केली असून, समितीची एक बैठक झाली आहे. तीस दिवसांच्या आसपास सर्व अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर होण्याच्या दृष्टीने परीक्षा झाल्यानंतरच्या कृती पद्धतीने बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता विद्यापीठाचे बहुतांश निकाल वेळेत लागण्याची सकारात्मक चिन्हे आहेत.

विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्यापीठांना एखाद्या अभ्यासक्रमांची परीक्षा झाल्यानंतर किमान 30 दिवसांत निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त 45 दिवसांच्या आत कसल्याही परिस्थितीत निकाल जाहीर करणे विद्यापीठांना बंधनकारक आहे. मात्र या कालावधीनंतर निकालास दिरंगाई झाल्यास, त्याबाबतचा खुलासा राज्यपाल अर्थात कुलपतींकडे द्यावा लागतो. तेही कारणासह विद्यापीठांना माहिती सादर करावे लागते. ही नामुष्की टाळण्यासाठी पुणे विद्यापीठाने हालचाली सुरू केल्यास, त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे.

 

 

विद्यापीठ अनुदान आयोग,राजभवन, नॅक यांच्याकडून विद्यापीठाचे निकाल वेळेल लागावेत, अशी अपेक्षा असते. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांचे निकाल वेळेत जाहीर व्हावेत, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेत समिती नेमली आहे. त्याद्वारे सर्व निकाल वेळेत लागण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

 

गेल्या दोन-तीन वर्षांपासून पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने वेळेत निकाल लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आहे. मात्र त्यातून काही अभ्यासक्रमांचे निकाल अपेक्षित वेळेत जाहीर होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. त्यात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. झुंजारराव, मॉडर्न विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनीता आढाव, प्राचार्य नेरकर, उपकुलसचिव डॉ. प्रसाद कुलकर्णी, राजेंद्र तलवारे यांचा समावेश आहे.

 

समितीच्या पुढीलप्रमाणे शिफारसी
* उत्तरपत्रिका तपासणी केंद्र दोन महिने आधीच निश्‍चित करणे
* जिल्हावार केंद्रीय मूल्यमापन केंद्र असावेत
* परीक्षेच्या दुसऱ्या दिवसापासून उत्तरपत्रिका तपासणी व्हावी
* उत्तरपत्रिका तपासणीस गैरहजर प्राध्यापकांवर कारवाई व्हावी

 

समितीची पहिली बैठक तीन दिवसांपूर्वी झाली. यात परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन महिने आधीच उत्तरपत्रिका तपासणी अर्थात केंद्रीय मूल्यमापन केंद्र (कॅप) ठिकाण निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ कमी होईल, यावर विचार झाला. त्यानंतर नगर, नाशिक आणि पुणे येथील केंद्रावर परीक्षा झाल्यानंतर त्याच जिल्ह्यात उत्तरपत्रिकेचे विकेंद्रीकरण केल्यास वेळेचा मोठा अपव्यय टळेल. परिणामी निकाल लवकर लागणे शक्‍य होईल, यावर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. ज्या विषयाची परीक्षा झाली, त्याची उत्तरपत्रिका तपासणी दुसऱ्या दिवसांपासून होण्याची व्यवस्था व्हावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तरपत्रिका तपासणीसाठी गैरहजर प्राध्यापकांवर नवीन विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करावी, या विषयावर समितीच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निकाल वेळेत लागत आहे. मात्र त्यातही 30 दिवसांच्या आत हे निकाल कसे जाहीर होतील, त्यासाठी समितीमार्फत काम सुरू आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी व नंतरच्या कार्यपद्धतीत काही सुधारणा केल्यास निकाल वेळेत लावणे शक्‍य आहे, त्याबाबींवर गांभीर्याने समिती विचार करीत आहेत. समितीचा अहवाल कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होईल. 
– डॉ. प्रफुल्ल पवार, वाणिज्य व व्यवस्थापन, अधिष्ठाता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button