breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लष्कर हद्दीतून १८ मीटर रस्त्याची निर्मिती करा- राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप काटे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी स्मार्ट सिटी म्हणून नावारुपाला येत आहे. मात्र, एका बाजूला विकासाकडे झेप घेत असतांनाच दुसरीकडे मात्र, शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. स्मार्ट सिटी म्हणून आधीचीच ओळख असणारा पिंपळे सौदागर व परिसरातला भागही वाहतुकीच्या या विळख्यातून सुटला नाही. या परिसरातून बहुतांश नागरिक व आयटीयन्स नोकरीनिमित्त हिंजवडीकडे जातात. त्यांना या रोजच्या वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास होत आहे. पिंपळे सौदागर येथील कासारवाडी ते वाकड ‘बीआरटी’ रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. भविष्यात कोकणे चौकात वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे काळाची पाउलं ओळखून पिंपरी चिंचवड महापालिकेने पिंपळे सौदागर येथील सर्व्हे नंबर ३१ ते ३९, हॉटेल क्रिस्टल मार्गे लष्करी हद्दीतून १८ मीटर रस्ता विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात संदीप काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कासारवाडी ते वाकड ‘बीआरटी’मार्गे हिंजवडी, पुणे आणि मुंबईकडे जाणा-या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे कोकणे चौक, शिवार चौक आणि जगताप डेअरी चौकात वाहतूक कोंडी होते. घरातून कामासाठी बाहेर पडायची सर्वांची एकच वेळ आणि कार्यालयात वेळेवर पोहोचायची घाईगडबड. रस्ता ओलांडताना पादचा-यांची उडणारी तारांबळ. खासगी वाहनांच्या अतिक्रमणाला भेदत जाणा-या पीएमपी बस. यामुळे होणारी विस्कळीत वाहतूक. कधी वाहतूक ठप्प, तर कधी कासवगतीने पुढे पुढे सरकणारी. यामुळे बराचसा वेळ रस्त्यावरच काढावा लागत असल्याने वाढणारा मानसिक ताण. अशा स्थितीतून पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना दररोजच तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो. रस्त्यावर व मुख्य चौकामध्ये वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. यामुळे परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तसेच नजीकच्या काळात कोकणे चौकात विकसित होणा-या ‘एचसीएमटीआर’ (High Capacity Mass Transit Route) मार्गावर ‘स्मार्ट सिटी’ विकास प्रकल्पांतर्गत दिल्लीतील ‘’पालिका बझार’’च्या धर्तीवर ४५ कोटी खर्चून भूमिगत शॉपींग कॉम्प्लेक्स (Underground Commercial Complex) बनविण्यात येणार आहे. त्यामध्ये २७० स्क्वेअर फुट जागेचे एकूण ५५ शॉप्स असणार आहेत. या शॉपींग कॉम्प्लेक्समुळे भविष्यात या भागात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नागरिकांसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्यामुळे उद्या कोकणे चौकात होणा-या वाहतूक कोंडीवर मार्ग काढणे अशक्य होणार आहे.

अशा परिस्थिती महापालिकेने कासारवाडी ते वाकड ‘बीआरटी’मार्गे पुण्यात अथवा मुंबईकडे जाणा-या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून कासारवाडीचा भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाण पुल उतरून, थोडे अंतर पुढे आल्यानंतर हॉटेल क्रिस्टलमार्गे सर्व्हे नंबर ३१ ते ३९ येथून पुढे काटे वस्ती, कुंजीर गोठा, साई चौक मार्गे शिवार चौकातील नियोजित ग्रेड सेपरेटरपर्यंत लष्करी हद्दीतून पर्यायी १८ मीटरच्या रस्त्याची निर्मिती करावी. त्याचा आराखडा तयार करून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मान्यता घेण्यात यावी. लष्कर प्रशासनाला जागेचा मोबदला देऊन भू-हस्तांतरण झाल्यानंतर हा रस्ता विकसित करावा. यामुळे पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक आणि शिवार चौक येथील मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा पडणारा ताण निश्चितच कमी होईल.

हा पर्यायी मार्ग काळाची गरज बनला आहे. पिंपळे सौदागर येथील वाढते नागरिकरण आणि बाजारीकरणामुळे भविष्यात वाहतूककोंडीची समस्या गंभीर होणार आहे. तत्पुर्वीच, या पर्यायी मार्गाच्या उभारणीसाठी महापालिकेने गांभिर्याने निर्णय घ्यावा, असे काटे यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button