breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरच्या स्थापत्यविषयक कामात अफरातफर, कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करा

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांचा आरोप
  • आयुक्त राजेश पाटील यांना दिले निवेदन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत कनिष्ठ अभियंता नरेश जाधव यांच्या नियंत्रणाखाली पिंपळे सौदागर येथे अत्यंत दुय्यम दर्जाची स्थापत्यविषयक कामे झाली आहेत. त्यांच्या कामकाजावर संशय निर्माण झाला असून ठेकेदारांसोबत त्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा आरोप आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या स्थापत्यविषयक प्रत्येक कामाची व आर्थिक व्यवहाराची निपक्षपातीपणे चौकशी करावी. यात दोषी आढळल्यास जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली आहे.

यासंदर्भात काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कनिष्ठ अभियंता नरेश जाधव ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत आहेत. पिंपळे सौदागर येथील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी त्यांची सध्या नेमणूक केलेली आहे. परंतु, त्यांनी आजपर्यंत केलेल्या स्थापत्यविषयक कामाचा दर्जा अत्यंत दुय्यम पध्दतीचा आहे. स्थापत्यविषयक कामांमध्ये असंख्य त्रुटी आहेत. जाधव यांच्या कामावर पिंपळे सौदागर येथील नागरिक असमाधानी असून त्यांच्याविरोधात तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पिंपळे सौदागर येथे केलेल्या प्रत्येक कामाची चौकशी होणे गरजेचे आहे.

पिंपळे सौदागर येथील प्रत्येक कामामध्ये आर्थिक देवानघेवान झाल्याचा संशय आहे. ठेकेदारांनी केलेल्या कामाचा दर्जा ढासळलेला असताना जाधव यांनी त्यांना पाठीशी घातले आहे. यावरून जाधव आणि ठेकेदार यांच्यात अर्थपूर्ण संबंध जोपासल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या पैशांची अशी विल्हेवाट लावून भ्रष्टाचार करणा-या अधिका-यांना पाठीशी का घातले जात आहे ?, असा सवाल काटे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंता जाधव यांनी केलेल्या प्रत्येक कामाची चौकशी करण्यात यावी. दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी संदीप काटे यांनी आयुक्त पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

————–

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देणार – काटे

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट अधिका-यांनी स्वतःच्या तुमड्या भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय भ्रष्ट अभियंते जोपासले आहेत. विकास कामांच्या नावाखाली नागरिकांनी करातून भरलेल्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी यांची साखळी तयार आहे. त्यातीलच कनिष्ठ अभियंता नरेश जाधव यांचे हात काळे झाल्याचा संशय असून त्यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देणार आहे, अशी माहिती संदीप काटे यांनी सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button