breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी-चिंचवड शिवसेनेचे ‘वाघ’ आता ‘गारठले’? वर्धापन दिनानिमित्त ‘डरकाळी’ दिसेना!

  • पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदारांची उदासीनता
  • स्थापना दिनानिमित्त शहरात कोणताही कार्यक्रम झाला नाही

पिंपरी (विकास शिंदे) – दोन खासदार, एक आमदार, ९ नगरसवेक आणि शेकडो पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी असलेल्या शिवसेनेचे शहरातील ‘वाघ’ आता ‘गारठले’ आहेत. एऱ्हवी ‘राजकीय डरकाळ्या’ फोडणारे आघाडीचे शिलेदार पावसाळा सुरू झाल्यामुळे काहीसे थंडावले आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडला आहे. कारण, स्थापना दिनानिमित्त संपूर्ण शहरात पक्षाच्या लौकिकाला साजेसा एकही कार्यक्रम झालेला दिसत नाही. मात्र, मुंबई येथील मेळाव्याला जेमतेम पदाधिकारी-नगरसेवक दाखल झाले आणि कार्यशाळा उरकून सायंकाळी शहरातकडे परतले.  त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या अणाभाका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्या आहेत. २०१९ ची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत भाजपविरोधात लढवण्याची भीष्मप्रतिज्ञा घेण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असे दोन संसद सदस्य निवडून दिले आहेत. तसेच, पिंपरी विधानसभा मतदार संघातून ॲड. गौतम चाबुकस्वार यांना आमदार म्हणून निवडून दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात कागदोपत्री ९ नगरसेवक आहेत. शहराच्या राजकारणातील दोन, खासदार आणि १ आमदार अशी तगडी ताकद असलेल्या पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त एकही जाहीर कार्यक्रम झाला नाही. एकही सामाजिक उपक्रम झाला नाही. यापूर्वी रस्त्यावर दिसणारी शिवसेनेची ताकद आता दिसत नाही. कोण आला रे…कोण आला…शिवसेनेचा वाघ आला…असा जल्लोष आता राहिला नाही.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपेक्षीत असलेली शिवसेना पिंपरी-चिंचवडमध्ये थंडावली आहे. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून शहर कार्यकारिणीतील महत्त्वांच्या पदांच्या निवडीही केल्या आहेत. मात्र, स्थानिक नेत्यांमध्ये उत्साहाचा अभाव असल्यामुळे शिवसेनेची ताकद असूनही प्रभाव दिसत नाही.

वास्तविक, स्थापना दिनानिमित्ताने राज्यातील आगामी निवडणुकांत ‘युती’ होणार नाही, अशी गर्जना झाली आहे. शहरातील भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेला मानणारा मोठा मतदार आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघाअंतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघाचा भाग येतो. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचाही चिंचवड आणि पिंपरीच्या राजकारणात प्रभाव आहे. गटनेते राहुल कलाटे हेही चिंचवडमधून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. शहराध्यक्ष योगेश बाबर यांनी पुढाकार घेवून तीनही मतदार संघनिहाय स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम घेणे अपेक्षीत होते. तसेच, शिवसैनिकांना स्थापना दिनानिमित्त किमान शुभेच्छा तरी द्यायला पाहिजे होत्या, अशी अपेक्षा कट्टर शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.

गटा-तटाच्या राजकारणाचा पक्षाला फटका…

शहर शिवसेनेत गटातटाचे राजकारण वाढले आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि गटनेते राहुल कलाटे यांच्यात राजकीय वाद आहे. महापालिकेच्या राजकारणात सत्ताधारी भाजपने शिवसेनेतील वादाला सोयीस्कर फुंकर घालण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ९ नगरसेवकांमध्येही एकवाक्यता नाही. तसेच, भोसरीकरांनाही शहराच्या राजकारणाशी देणे-घेणे राहिलेले नाही. खासदार आढळराव पाटील यांनाही भोसरीतील आमदारांच्या ‘शर्यती’ शिवाय पक्षसंघटनेबाबत जिव्‍हाळा दिसत नाही. शहराध्यक्ष योगेश बाबर यांनाही अद्याप सूर गवसलेला नाही. वास्तविक, शहरातील राजकारणात बलाढ्य असलेल्या शिवसेनेला पक्षांतर्गत गटातटामुळे फटका बसत आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचे धनी व्‍हावे लागेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी शहरातील पदाधिकाऱ्यांना तिकडे बोलावण्यात आले होते. आम्ही सर्वजन मुंबईला गेलो होतो. त्याठिकाणी कार्यशाळाही झाली. मात्र, शहरात आम्ही कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नाही.

– योगेश बाबर, शहराध्यक्ष, शिवसेना.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button