पिंपरी चिंचवड शहरात करोनाच्या एक लाखाहून अधिक चाचण्या
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड शहरात करोनामुळे एक लाख दहा हजाराहून अधिक नागरिकांना करोना चाचण्या कराव्या लागल्या. त्यापैकी 23 हजार 682 नागरिकांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
करोनाचे वाढते रुग्ण पाहता शहरात करोना तपासणीची यंत्रणा सुरु करण्यात आली. करोनाच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या. सुरुवातीला लवकरच आटोक्यात येईल, असे वाटत असतानाच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून करोनाने आपली दुसरी फेरी सुरू केली. “करोना’ने खरा वेग पकडला तो जुलै महिन्यापासूनच. मार्च महिन्यात शहरात अवघे 14 रुग्ण होते.
तर जून अखेरपर्यंत हा आकडा तीन हजारांच्या पुढे गेला. परंतु जुलै महिन्यात मात्र करोनाचा उद्रेक पहावयास मिळाला. जुलै महिन्यात 18 हजाराहून अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. एकीकडे करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. 3 ऑगस्ट रोजी रात्रीपर्यंत एकूण 16206 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. हे प्रमाण एकूण करोनाबाधितांच्या तुलनेत 67 टक्क्यांहून अधिक आहे.
जुलै महिन्यात शहरात केवळ रुग्णसंख्या वाढत नव्हती. तर करोनाने मृत्यूचे थैमान घालण्यास देखील सुरुवात केली. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत शहरातील व शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या एकूण 77 करोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. 111 दिवसांमध्ये 77 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. परंतु पुढील 34 दिवसांमध्ये 412 रुग्णांचा करोनाने बळी घेतला. एकूण रुग्णांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी निश्चितच खूप कमी आहे. परंतु गेल्या एका महिन्यात वाढलेले मृत्यूचे प्रमाण ही चितेंची बाब आहे.