breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत अजित पवारांच्या निर्णयामुळे ‘प्रचंड नाराजी’

  • उपमुख्यमंत्री झाल्याचे कोडकौतुक नाही
  • कार्यकर्त्यांच्या चिंतेत कमालीची भर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊन आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा निर्णय पक्षाच्या विरोधात जाऊन घेतल्याने तो शरद पवार यांना मान्य पडला नाही. तसेच, राज्यभर अजित पवार यांच्या विरोधात पडसाद उमटत असताना पिंपरी-चिंचवडमध्येही राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी आणि नेत्यांचा संभ्रम निर्माण झाला आहे.

विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांसह त्यांच्या चाहत्यांनी पवार यांच्यावर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव केला. शुभेच्छांचे फोटो तयार करून फेसबुकवर अपलोड करण्यात आले. त्याला अनेकांनी लाईक देखील केले. मात्र, आज अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दादा आता उपमुख्यमंत्री झाल्याने त्याचा आनंद पिंपरी-चिंचवडमध्ये साजरा होताना दिसत नाही. शहरातील राष्ट्रवादीच्या एकाही नामांकीत पदाधिका-याने दादांना सोशल माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या नाहीत.

याबाबत पिपंरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, अजितदादांनी जरी अशी भूमिका घेतली असली तरी शरद पवारसाहेबांचा निर्णय पक्षासाठी महत्वाचा मानला जातो. त्यामुळे मी पक्ष आणि साहेबांसोबत कायम आहे. परंतु, मी पुन्हा येईल… मी पुन्हा येईल… असे म्हणत मुख्यमंत्री एवढ्या सकाळी-सकाळी साखर झोपेत असलेल्या नागरिकांना उठवायला येईल, असे स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते, अशी खरमरीत टिकाही साने यांनी केली.

नगरसेवक मयूर कलाटे म्हणाले की, पवारसाहेब हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा निर्णय पक्षासाठी अंतिम मानला जातो. पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. दादा जरी भाजपसोबत गेले असले तरी ते लवकरच पक्षात परततील असा विश्वास मला वाटतो, असे कलाटे म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, राज्यातील ज्या घडामोडी आहेत. त्या पक्षाच्या निर्णयावर अवलंबून असतो. पक्षाचे वरीष्ठ नेते मंडळी जो निर्णय देतील, तो मान्य करावाच लागतो. सध्याच्या घडामोडी ज्या सुरू आहेत. त्यावर बोलणे क्रमप्राप्त वाटत नाही. आम्ही पक्षात कायम आहोत. पक्षासोबत आहोत.

संदीप काटे म्हणाले की, राष्ट्रवादीतील प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांसाठी पवारसाहेबांचा निर्णय अंतिम मानला जाते. तो पक्षातील सर्वांना मान्य करावाच लागतो. राज्यात सरकार स्थापनेबाबत सध्या पवारसाहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्यच आहे. कारण, राजकारणामध्ये क्षणाक्षणाला परिस्थिती बदलत असते. त्यानुसार वरीष्ठ नेत्यांना निर्णय घ्यावा लागत असतो. आपण अंदाज आणि शक्यता वर्तवित असलो तरी खरी परिस्थिती वरीष्ठ नेत्यांना ज्ञात असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button