breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीची ‘सुबेदारी’; पक्षांतर्गत चर्चा रंगलीय ‘भारी’

– संघटनात्मक जबाबदारीसाठी लांडे, शेट्टी अन्‌ पवार यांच्या नावे आघाडीवर

– शरद पवार, अजित पवारांसह पार्थ पवारांकडे इच्छुकांची ‘फिल्डिंग’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला. अजित पवार यांचा विशेष जिव्हाळा असलेले शहर. पण, २०१७ मध्ये भाजपाने फोडाफोडी करुन महापालिकेवर वर्चस्व मिळवले. मात्र, हा ‘गड’पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांनी रणनिती आखली आहे.

शहर पातळीवर पक्षांतर्गत संघटनात्मक बदल केले जाणार असून, त्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली. त्यामुळे आता शहराची सुबेदारी कुणाकडे सोपवली जाणार? याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, माजी कार्याध्यक्ष जगदिश शेट्टी आणि युवा नेते संदीप पवार यांनी शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याबाबत अजित पवार यांच्याकडे मागणी करीत असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माजी आमदार लांडे यांना सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लांडे यांनी मतदार संघामध्ये आढावा बैठका आणि कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी थेट संपर्क असलेला अनुभवी नेता म्हणून लांडे यांच्याकडे पाहिले जाते. लांडे यांना महत्त्वाची जबाबदारी मिळावी म्हणून काही पदाधिकारी अजित पवार यांना भेटणार आहेत, असे बोलले जाते.

आमदार अण्णा बनसोडे यांची शिफारस…

पक्षाचे माजी कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी यांना शहर पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळावी. यासाठी पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शिफारस केली आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे निकटवर्ती म्हणून शेट्टी यांची ओळख आहे. त्यामुळे शेट्टी यांना संधी मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीतील एक गट सक्रिय झाला आहे.

युवा नेते संदीप पवार यांचीही मागणी…

ताथवडे-पुनावळे आणि वाकड प्रभागातील राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांनीही शहर पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळावी. यासाठी त्यांनी अजित पवार यांना मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांच्या निवडणूक कार्यात संदीप पवार सक्रीय होते. तसेच, अजित पवार यांचा ‘निष्ठावंत कार्यकर्ता’म्हणून संदीप पवार यांची ओळख आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ‘कारभारी’अजित पवार शहर संघटनेच्या बदलाबाबत कोणती भूमिका घेतात हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे, विलास लांडे, जगदिश शेट्टी किंवा संदिप पवार यांनी याबाबत अधिकृतपणे कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच,  माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, संतोष कोकणे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, विक्रांत लांडे आदी नवोदितांनी पक्ष संघटनेत सक्रिय व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button