breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी संदीप पवार की प्रशांत शितोळे?

– माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

– ‘नवा चेहरा’ आगामी विधानसभा-लोकसभेचे मैदान मारणार?

पिंपरी। (खास प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिव्‍हाळ्याचे शहर असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी युवा नेते संदीप पवार किंवा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या संघटनात्मक पदांवर नव्या चेह-यांना संधी देवून सत्ताधारी भाजपवर ‘हल्लाबोल’ करण्याची भूमिका राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ अजित पवार यांनी घेतली. त्यादृष्टीने संघटनात्मक पातळीवर विविध बदलही करण्यात येत आहेत.  पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याबाबत पक्षश्रेष्ठींनी संकेत दिले आहेत. त्यातच त्यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकालही पूर्ण झाला आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदी पक्षातील नव्या चेह-याला संधी देण्यात येणार आहे.

दुसरीकडे, ज्येष्ठ नगरसवेक विठ्ठल उर्फ नाना काटे आणि दत्ता साने यांच्यापैकी साने यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली असून, नाना काटे यांना चिंचवड विधानसभेची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दरम्यान, भ्रष्टाचार अथवा अन्य कोणताही आरोप नसलेला नवा आणि उमेदीचा चेहरा राष्ट्रवादीत संघटनात्मक पदावर काम करावा, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींची आहे. शहरातील सत्ताधारी असलेल्या भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप चिंचवड विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जगताप यांची भूमिका भाजपकडून आक्रमक राहणार आहे. त्यामुळे जगताप यांची त्यांच्याच मतदार संघात कोंडी करण्याची रणनिती अजित पवार यांनी आखली आहे.

विशेष म्हणजे, जगताप यांचे प्रतिस्पर्धी आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनीही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून चिंचवड विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार असलेल्या विठ्ठल उर्फ नाना काटे यांना ताकद देण्यासाठी चिंचवडमधूनच नव्या दमाच्या चेह-याला शहराध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्याची गरज आहे. दुसरीकडे, भोसरी विधानसभा मतदार संघातून दत्ता साने यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी देवून राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीतील संभाव्य ‘दुफळी’ टाळली. त्यामुळे शहराध्यक्षपद आता चिंचवडला मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सध्यस्थितीला स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे विद्यमान कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी शहराध्यक्षपदासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत शितोळे यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतरही त्यांना पक्षाने संधी दिल्यामुळे निष्ठावान पदाधिका-यांमध्ये त्यांच्या नावाला विरोध आहे. मात्र, आक्रमक भूमिका घेणारा तरुण चेहरा म्हणून शितोळे यांना झुकते माफ मिळणार? असाही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर आहे. मात्र, नगरसेवक अजित गव्‍हाणे, राजू मिसाळ, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचीही नावे चर्चेत आहेत.

निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळणार?

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संदीप पवार यांची ओळख आहे. शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर पवार यांनी स्पर्धेत उडी घेतली आहे. ताथवडे गावातील विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाविरोधात न्यायालयात स्थानिक नागरिकांची बाजू प्रभावीपणे मांडणारा अभ्यासू युवा चेहरा शहराध्यक्षपदासाठी हितकारक ठरु शकतो. तसेच, लोकसभा निवडणुकीत पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा पिंपरी-चिंचवड हद्दीलगतच्या मुळशी तालुक्यातील गावांत आक्रमकपणे प्रचार केला होता. मुळशी पंचायत समितीचे तत्कालीन सभापती रणनाना पवार यांनी २००१ पासून राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांच्या निधनानंतर ताथवडेच्या पहिल्या नगरसेविका यमुना पवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात वातावरण असतानाही संदीप पवार यांनी ताथवडे-पुनवळे- काळाखडक-वाकड प्रभागातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. विशेष म्हणजे, स्वच्छ प्रतिमा आणि अजित पवार यांचे निष्ठावान असलेल्या संदीप पवार यांच्याकडे शहराध्यक्षपदाची सूत्रे दिली जातील, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button