breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘डॉक्टर’भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार?

भाजपाचे महापौर, सभागृह नेत्यांवर महासभेत गंभीर आरोप

माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल स्थगितीसाठी न्यायालयात जाणार

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून भरती करण्यासाठी सत्ताधारी भाजपाचे महापौर आणि तत्कालीन सभागृह नेते यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. संबंधित भरती प्रक्रिया नियमांना डावलून करण्यात आली असून, ती भरती रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी विरोधी पक्षनेता योगेश बहल यांनी घेतली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरूवारी घेण्यात आली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत ८ रुग्णालये व २७ दवाखाने कार्यरत आहेत. त्यापैकी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे बहुविध शाखांचे व ७५० खाटांच्या क्षमतेचे सर्वात मोठे रुग्णालय कार्यरत असून, त्यामार्फत महापालिका हद्दीतील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते. मात्र, तज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे महापालिका आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. त्यासाठी नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ६ रुग्णालयांमध्ये डी.एन. बी. कोर्सेस सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यासाठी अस्थिरोग, प्लॅस्टीक सर्जरी, भूलशास्त्र, क्ष-किरण, मेडिकल व सर्जिकल ऑन्कोलॉजी, गायनाकालॉजिक ऑन्कोलॉजी, रेडिओ थेरपी, भूलशास्त्र , क्ष-किरण, मेडिसीन, शल्यचिकीस्ता, रिस्पेरेटरी डिसीज, भूलशास्त्र, क्ष- किरण, नेत्ररोग, युरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, मेडीसीन अशा संवर्गातील पदभरतीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता. या प्रस्तावानुसार 104 विविध पदे भरण्यात येणार आहेत.
मात्र, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सभागृहात चर्चा होण्यापूर्वीच हा प्रस्ताव मंजूर केला. प्रस्ताव मंजूर केल्यानंतर चर्चा करण्यात आली, ही बाब शंकेला वाव देणारी आहे.
डॉक्टर भरतीला विरोध नाही पणभ्रष्ट कारभार नको…
दरम्यान, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1954 नुसार, वैद्यकीय पद भरतीकरता नियुक्ती अधिकार असलेल्या व्यक्तीनेच भरती प्रक्रिया करावी, असा नियम आहे. मात्र, महापालिकेतील ही भरती नियुक्तीचे अधिकार नसलेल्या लोकांकडून करण्यात आली असून, ती नियमबाह्य आहे. कोविड काळात डॉक्टर भरतीसाठी आम्ही विरोध करीत नाही. पण, चुकीच्या पद्धतीने भरती करु नका, असे आमचे म्हणणे आहे, असा दुजोराही बहल यांनी दिला आहे.
केंद्र सरकारच्या अध्यादेशाचे उल्लंघन…
वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘डीन’ राजेश वाबळे हे क्लिनिकल नाहीत. त्यांनी संबंधित डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारने २०१५ मध्ये काढलेल्या अध्यादेशानुसार, वायसीएममध्ये काम करणाऱ्या आर्हताधारक डॉक्टरांना संबंधित अस्थापनांवर नियुक्त करणे नियमानुसार बंधनकारक होते. आर्हताधारक १३ डॉक्टरांची पदे वगळून भरती प्रक्रिया राबवणे गरजेचे होते. याच अनुभवी शिक्षकांच्या आधारे श्रीकर परदेशी यांच्या मदतीने वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळाली होती. पण, त्यातील आर्हताधारक ८ लोकांना भरतीप्रक्रियेत डावलण्यात आले, असा आरोप योगेश बहल यांनी केला आहे.
भाजपाचा माजी मंत्रीही भ्रष्टाचारात सहभागी…
माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आपल्या कार्यकाळात डॉ. सोनी यांना अधिकारपदी बसवण्यासाठी संबंधित डॉक्टरांकडून पैसे घेतले. संबंधित पैसे डॉ. सोनी यांची सर्वाकडून जमा केले. एकनाथ पवार यांनी डॉ. सोनींच्या मदतीने हा भ्रष्टाचार केला आहे. त्यासाठी भाजपाचा माजी मंत्र्यांने दबाव आणला होता. या 104 पैकी भरतीमध्ये 74 लोकांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी अनेकांकडून 30 ते 40 लाख रुपये घेण्यात आले आहेत, असा धक्कादायक आरोप योगेश बहल यांनी केला.
डॉक्टर भरती प्रक्रियेतील आरोप चिंताजनक : राहुल कलाटे
महापालिकेतील वैद्यकीय अस्थापनेवर भरती करण्यासाठी नियमांचे उल्लंघन झाले आहे. एका नियुक्तीमागे 30 ते 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप भाजपावर आमचे राष्ट्रवादीचे सहकारी योगेश बहल यांनी केला आहे. महापालिका सभागृहात अशाप्रकारे कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप होणे ही बाब चिंताजनक आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशी प्रक्रिया शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button