पिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘बायोमेट्रीक’ हजेरीवरून सभागृहात खडाजंगी

विरोधक आक्रमक : प्रस्तावाला अखेर मंजुरी
पिंपरी – पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवकांची बायोमेट्रीक हजेरी नोंदणी यंत्रणा कार्यान्वीत करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत विरोधी पक्षनेता योगेश बहल यांनी सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रभाग समितीच्या सभांना ही पध्दत कार्यन्वीत न करता महासभेलाच बायोमेट्रीक हजेरीची पध्दत लागू करण्याची कल्पना कोणी सूचविली. त्याची अंमलबजावनी कशा पध्दतीने होणार आहे, अशा प्रश्‍नांचा भडीमार करीत बहल यांनी सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर शरसंधान साधले.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या सत्ता कार्यकाळातील पहिली सर्वसाधारण सभा अनेक विघ्नांचा सामना करीत गुरूवारी (दि. 20) पार पडली. त्यात अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. पहिलाच विषय नगरसेवकांच्या “बायोमेट्रीक’ हजेरीचा चर्चेसाठी घेण्यात आला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभाराच्या नावाखाली सभागृहात हजेरी लावणे नगरसेवकांना बंधनकारक करण्यासाठी “बायोमेट्रीक’ हजेरी पध्दत अंमलात आणण्याचा प्रस्ताव मांडला. “बायोमेट्रीक’ हजेरीसाठी यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या प्रवेश द्वारावर चार मशिन्स कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश करताना आणि सभा संपल्यानंतर सभागृहातून बाहेर पडताना हजेरीची नोंद करावयाची आहे. तीन किंवा चार सभांना गैरहजेरी नोंद झाल्यास संबंधित नगरसेवकांचे पद धोक्‍यात येणार आहे. हा नियम जाचक असल्याचा मुद्दा मांडत योगेश बहल यांनी “बायोमेट्रीक’ पध्दतीची कल्पना कोणी सूचविली आणि कशा पध्दतीने अंमलबजावणी होणार आहे, याचे स्पष्टीकरण संबंधीत अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी केली. त्यावर नगरसचिव उल्हास जगताप यांनी खुलासा दिला.

एकनाथ पवार म्हणाले, प्रभाग समिती सभेच्या आधी “बायोमेट्रीक’ हजेरी पध्दत सर्वसाधारण सभेत प्रथम लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभाग समिती सभेसाठीही अंमलात आणण्यात येईल. कामात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न होत असताना यात खोडा घालण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न आहे. सभागृहाला शिस्त लागावी, नागरिकांशी असलेल्या बांधिलकीची नगरसेवकांना जाणिव असावी, यासाठी ही पध्दत राबविण्यात येत आहे, असेही पवार म्हणाले. त्यानंतर महापौर नितीन काळजे यांनी या विषयाला मंजुरी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button