breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजपाला पालकमंत्र्यांवरून ‘पोटदुखी’? कारण ‘कोरोना’अन्‌ धोरण ‘पीसीएमसी’

– माजी सरचिटणीस प्रमोद निसळ यांच्याकडून ‘स्वतंत्र पालकमंत्री’ची मागणी

– उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांची भाजपाच्या दोन्ही आमदारांना धास्ती?

पिंपरी । महाईन्यूज । अधिक दिवे

मुंबई-पुण्यापाठोपाठ ‘उद्योगनगरी’पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना दिवसेंदिवस वाढू लागला आहे. महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. शहरातील तीनपैकी दोन आमदार भाजपाचे आहेत. तरीही कोरोनाचे निमित्त करुन भाजपाचे दोन्ही आमदार राज्य सरकारला ‘लक्ष्य’करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, राज्य सरकारवर ‘बोट’ठेवले असले तरी आमदारांचा निशाणा ‘पालकमंत्र्यांवर’ दिसतो. कारण, कोरोना निमित्त आहे…पण धोरण आगामी महापालिका निवडणूक अर्थात ‘पीसीएमसी’ आहे.

          कोरोना आणि लॉकडाउनमध्ये राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असा आक्षेप घेत राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने नुकतेच ‘महाराष्ट्र बचाओ…मेरा आंगण रणांगण’असे आंदोलन केले. तत्त्पूर्वीच, भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडले…अशी टीका केली होती. त्यानंतर चिंचवडचे आमदार आणि माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनीही ‘राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवून जनतेच्या तोंडाला पाने पुसली…’असे टीकास्त्र सोडले होते. त्यानंतरच भाजपाचे माजी सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी पिंपरी-चिंचवडसाठी ‘स्वतंत्र पालकमंत्री’द्या, अशी मागणी केली आहे.

          पिंपरी-चिंचवड भाजपाचा एकूण सूर पाहता आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपाची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे दिसते आहे. कारण, महापालिका (पीसीएमसी) ताब्यात ठेवल्याशिवाय २०२४ ची विधानसभा सोपी नाही, ही बाब भाजपाच्या दोन्ही आमदारांना ज्ञात आहे. मात्र, या सर्व राजकीय प्रक्रियेत दोन्ही आमदारांसमोर पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडवे आव्हान राहणार आहे.

          विशेष म्हणजे, पालकमंत्री अजित पवार यांचे पुणे जिल्हयातील प्रमुख पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील हालचालींवर बारिक लक्ष आहे. पुण्यातील विधान भवन येथून अजित पवार जिल्ह्यातील सर्व कारभार चालवतात. त्याठिकाणी होणाऱ्या बैठकांना सर्व आमदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, आयुक्त , पोलीस आयुक्त असे प्रमुख अधिकारीही उपस्थित असतात. अजित पवार यांचा वाढता प्रभाव पाहता आगामी महापालिका निवडणुकीत डोकेदुखी वाढणार आहे. दुसरीकडे, पालकमंत्र्यांनाच ‘लक्ष्य’केल्यास शहर राष्ट्रवादीतील अस्वस्थताही वाढणार आहे. त्यामुळे आमदारांसह भाजपामधून पालकमंत्री अजित पवार यांच्या विरोधात सूर काढला जात आहे.

          दरम्यान, राज्यातील सरकार कोरोनाचा लढा लढण्यात अपयशी ठरत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहरात पाच हजाराहून जास्त तर पिंपरीत 391 नागरिक आजपर्यंत कोरोनाचे रुग्ण आहेत. या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार अपयशी ठरले आहे. पिंपरी चिंचवड या उद्योगनगरीकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पिंपरी चिचंवड शहराचे उद्योगक्षेत्रातील महत्व विचारात घेता या उद्योगनगरीसाठी स्वतंत्र पालकमंत्री नेमावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपाचे माजी सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी मंगळवारी (26 मे) केली आहे.

प्रमोद निसळ यांचा बोलविता धनी कोण?

लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत एकदाही पालकमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड शहरास भेट दिली नाही. या उद्योगनगरीकडून राज्याला व देशाला पुण्यापेक्षा जास्त महसूल मिळतो. तरीदेखील पालकमंत्र्यांचे पिंपरी चिंचवडकडे दुर्लक्ष आहे. या महाविकास आघाडी सरकारने पिंपरी- चिंचवड शहरासाठी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून किती निधी दिला हे देखील जाहीर करावे, अशीही मागणी प्रमोद निसळ यांनी केली आहे. पण, महापालिका निवडणुकीपासून निसळ एकदाही बोलते झाले नाहीत. पण, अचानक ‘स्वतंत्र पालकमंत्री’चा मुद्दा हातात घेतल्यामुळे प्रमोद निसळ यांचा बोलविता धनी कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे.

शहर राष्ट्रवादीकडून प्रत्त्यूत्तर मिळणार?

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीसाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार म्हणजे ‘संजीवनी’आहेत. भाजपाने प्रमोद निसळ यांच्या माध्यमातून एकप्रकारे अजित पवार यांनाच ‘लक्ष्य’ केले आहे.  राज्य सरकारचे  अपयश सांगता…सांगता…स्वतंत्र पालकमंत्रीची मागणी चिंतन करायला लावणारी आहे. अजित पवार यांच्याविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे अथवा महापालिकेतील विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे किंवा राष्ट्रवादीचे स्थानिक नेते यावर काय प्रत्त्यूत्तर देणार? विशेष म्हणजे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. प्रमोद निसाळ यांची मागणी विद्यमान पालकमंत्र्यांचे अपयश दाखवणारी आहे, यावर राष्ट्रवादी कशाप्रकारे प्रत्त्यूत्तर देणार? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button