breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी जागा निश्चित ?

डीसीपीची पालिकेकडे जागेचा प्रस्ताव ; चिंचवडच्या महात्मा फुले विद्यालयाच्या जागेला पसंती

पिंपरी (विकास शिंदे) – शहराचे वाढते नागरीकरण व गुन्हेगारीमुळे पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. परंतू, पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेने चार जागांचे प्रस्ताव ठेवले होते. त्यापैकी चिंचवडच्या प्रेमलोक पार्कमधील महात्मा फुले विद्यालयाच्या इमारतीला पुणे शहराचे अप्पर पोलीस आयुक्तांसह पोलीस उपआयुक्त परिमंडल -3 च्या अधिका-यांनी प्राथमिक पसंती दर्शविली आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालयांची जागा जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे त्या जागेची पाहणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, डीसीपी गणेश शिंदे, अ प्रभागाचे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांनी आज (मंगळवारी) केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचे वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, गुन्हेगारीकरणामुळे पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडसह कोल्हापूर, मिरा-भाईंदर या तीन शहरांसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय स्थापन करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस आयुक्‍तालय होण्याची गरज असल्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास अहवालास गृह विभागाने मान्यता दिली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्ताला मंजुरी मिळाली.

नवीन आयुक्तालयात पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, सांगवी, वाकड, हिंजवडी, दिघी, चिखली, भोसरी एमआयडीसी हे 10 आणि ग्रामीणमधील चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी हे 5 असे एकूण 15 पोलीस ठाण्यांचा आयुक्तायात समावेश असणार आहे. पोलिस आयुक्‍तालयासाठी अतिरिक्‍त पोलीस महासंचालक दर्जाचा पोलीस अधिकारी प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. या आयुक्‍तालयाच्या कार्यक्षेत्रातील सद्यस्थितीतील सुमारे 22 लाख लोकसंख्येच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न हाताळला जाणार आहे. आयुक्‍तालयासाठी वर्षाला सुमारे 400 कोटी रुपयांच्या खर्चांची तरतूद करण्यात येणार आहे. परंतू, पोलीस आयुक्तालयाची लागणारी जागा तात्पुरती भाड्याने घेण्यात येणार होती.

त्यानूसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी जागेची आवश्यकता होती. याकरिता पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 च्या अधिका-यांनी जागेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे मागणी केली. त्यानूसार महापालिकेने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे फ प्रभाग कार्यालय, नेहरुनगर कार्यालयाची जागा, पिंपरीच्या मासुळकर कॅालनीतील जूने डी.वाय.पाटील कॅालेजची इमारत, चिंचवडची महात्मा फुले विद्यालयाची इमारत व जागा आणि निगडी प्राधिकरणातील सेक्टर 23 मधील हेगडेवार भवन अशा चार जागेवरील इमारतीचे प्रस्ताव पोलीस आयुक्तालय कार्यालयासाठी ठेवले होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांसाठी त्या जागेवरील इमारतींची पाहणी पुणे शहराचे अप्पर पोलीस आयुक्तांनी यांनी केली. त्यांनी चिंचवडच्या प्रेमलोक पार्कमधील महात्मा फुले विद्यालयाची इमारत व रिकामी जागा योग्य असल्याचे कळविले आहे. त्यानूसार ही इमारत सुरुवातीच्या कालावधीत प्रस्तावित पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यात येणार आहे. त्यामुळे सदरील इमारत पोलीस आयुक्तालयासाठी किती दिवसात उपलब्ध होईल, त्या इमारतीचा शासकीय भाड्यांचा दर काय राहील, तसेच सदरील इमारतीत आवश्यक फर्निचरसह उपलब्ध होऊ शकेल काय ? याबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस उप-आयुक्त परिमंडल -3 चे गणेश शिंदे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापालिका सभागृह नेता एकनाथ पवार यांच्याशी चर्चा केली. तसेच महात्मा फुले विद्यालयाची जागा देण्यासाठी शासकीय दराने भाडेकरार व इमारती ताब्यात देण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button