पिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील भ्रष्टाचाराची ‘सीआयडी’ व ‘इडी’ मार्फत चौकशी करावी – एड. गौतम चाबुकस्वार

  • चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली मागणी
  • मुख्यमंत्री व राज्यपालांकडे तक्रार करणार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सीआयडी तसेच इडीच्या माध्यमातून करण्याची मागणी माजी आमदार एड. गौतम चाबुकस्वार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. याप्रकरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्यपाल भागत सिंह कोशारी यांच्याकडे ही तक्रार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खंडणी व दरोडा पथकाचे पोलीस नाईक नितीन बाळासाहेब लोखंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी व दरोडा पथकातील वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुधीर अस्पत तसेच तत्कालीन पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी केलेल्या कोटयावधी रूपयाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी लोखंडे यांनी जे पत्र सोशल मिडीयावर सार्वजनिक केले. ते पत्र अतिशय गंभीर स्वरूपाचे असून त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात चाललेला कोटयावधी रूपयांच्या भ्रष्टाचाराला तोंड फुटणार आहे, असे चाबुकस्वार यांनी सांगितले.

आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या मागण्या

१) पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी १०० एकर जागा सुधीर अस्पत यांच्या मदतीने तळेगाव येथे खरेदी केली आहे, असे पत्रामध्ये नमुद आहे, त्याची चौकशी सीआयडीमार्फत करून F.I.R. दाखल करावा.

२) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर खंडणी व दरोडा पथकाच्या प्रमुख पदी सुधीर अस्पत यांची नियुक्ती केली. नितीन लोखंडे आणि पोलीस हवालदार खांडे यांच्या मार्फत सुधीर अस्पत भ्रष्टाचाराच्या पैशाची वसुली करत होते. तसा कबुली जबाब पत्रामध्ये आहे. म्हणून याची सीआयडीमार्फत चौकशी करून सुधीर अस्पत यांच्यावर F.I.R. दाखल करण्यात यावा.

३) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात खंडणी/दरोडा विषयक दोन कार्यालये का आहेत, याची चौकशी करून कासारवाडीतील कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराचा काळा पैसा जमा केला जात आहे. असा कबुली जबाब नितीन बाळासाहेब लोखंडे यांनी दिला आहे. त्याची चौकशी सीआयडीमार्फत करावी तसेच कासारवाडीचे दुसरे खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे कार्यालय ताबडतोब बंद करण्यात यावे.

४) नितीन बाळासाहेब लोखंडे यांनी या पत्रात कबुली जबाब दिला आहे की, लोखंडे हे स्वत: आणि हवालदार खांडे हे दर महिन्याला सुधीर अस्पत यांच्या सांगण्यावरून दरमहा ४ कोटी रूपये जमा करून सुधीर अस्पत यांना देतात. हे पैसे कोणाकडून कलेक्ट करायचे. यामध्ये अवैध धंदे, जमीनीचा ताबा मारणे अशा स्वरूपाची गुन्हेगारी स्वरूपाची कामे सुधीर अस्पत यांचेमार्फत केली जात. ४ कोटी पैकी फक्त ५० लाख रूपये पोलीस आयुक्त पद्मनाभन यांना द्यायचे. बाकीच्या साडेतीन कोटी रूपयांचे काय करायचे व कुणाला देत होते, याची चौकशी सीआयडीमार्फत व्हावी, पद्मनाभन आणि सुधीर अस्पत यांचेवर F.I.R. नोंदविण्यात यावा.

५) सुधीर अस्पत यांनी पद्मनाभन यांना हनीट्रॅपमध्ये अडकविले होते. या हनी कोण कोणत्या आहेत व कुठे राहातात याची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी.

६) पद्मनाभन यांचे भ्रष्टाचाराचे २० कोटी रूपये श्रीचंद आसवानी यांनी White करून दिले. ते कसे काय केले म्हणून श्रीचंद आसवानी यांची इडीमार्फत चौकशी करून त्यांचेवर आणि पद्मनाभन साहेबांवर F.I.R. दाखल करावा.

७) श्रीचंद आसवानी हे पिंपरी कॅम्पमधील नामवंत बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे सुधीर अस्पत यांचे भ्रष्टाचाराने कमविलेले किती पैसे गुंतविले आहेत. तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांचे किती पैसे गुंतविले आहेत, याची चौकशी इडीमार्फत करून श्रीचंद आसवानी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

८) नितीन लोखंडे आपल्या कबुली जबाबात सांगतात, सुधीर अस्पत यांचे विश्रांतवाडी येथे हॉटेलचे बांधकाम चालू आहे. हे बांधकाम कोणाच्या नावावर आहे? व किती रूपये खर्च केले आहेत ? आणि पैसे कुठुन आले याची सीआयडीमार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा.

९) नितीन लोखंडे आपल्या कबुली जबाबात लिहितात, पठाण नावाचे पोलीस कर्मचारी बदलून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आलेले आहेत, ते देखील भ्रष्टाचाराच्या पैशाची वसुली करतात. त्यांची देखील चौकशी करावी, व गुन्हा दाखल करावा.

१०) नितीन लोखंडे आपल्या कबुली जबाबात लिहितात, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना सुधीर अस्पत यांनी मॅनेज केले आहे. हे मॅनेज करणे म्हणजे काय याची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी.

११) नितीन बाळासाहेब लोखंडे आणि महेश दत्तात्रय खांडे हे दोघे ही पोलीस आयुक्तालयात खंडणी/दरोडा विरोधी पथकामध्ये कर्मचारी आहेत. त्यांचा कबुली जबाब महत्त्वाचा आहे. त्यांनी केलेले आरोप सार्वजनिक झालेले आहेत. त्यांच्या दोघांच्या पत्नींचे नावे लेबर कॉन्ट्रक्ट लायसन्स काढले आहे. असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, या कॉन्ट्रक्टचे खरे मालक सुधीर अस्प्त आहेत. असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून लोखंडे आणि खांडे यांचा कबुली जबाब सीआयडीमार्फत नोंदवावा, व त्याची चौकशी करावी.

पिंपरी-पोलीस आयुक्तालयामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे, त्याला वाचा फोडण्यासाठी मी मोहिम उघडली आहे. सुधीर अस्पत यांना तात्काळ त्यांच्या पदावरून निलंबित करावे. कारण, भविष्यामध्ये तपासाच्या वेळी ते बाधा निर्माण करणार नाहीत. लोखंडे आणि खांडे यांची बदली कोठेही करू नये जेणे करून त्यांच्या कबुली जबाबाची सत्यता सीआयडीच्या तपासामध्ये महत्त्वाची ठरणार आहे, असेही माजी आमदार चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button