breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये तीन दिवस रंगणार ‘स्वरसागर महोत्सव’

येत्या २३, २४ व २५ जानेवारीला निगडीच्या मदनलाल धिंग्रा मैदानावर भरणार

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवडमधील गानरसिक आतुरतेने ज्याची वाट पाहात असतात असा स्वरसागर महोत्सव येत्या २३, २४ व २५ जानेवारी रोजी होणार असून ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांचे शास्त्रीय गायन हे यंदाचे विशेष आकर्षण आहे. यंदा स्वरसागर महोत्सवाचे २१ वर्ष असून त्यानिमित्ताने संगीत रसिकांना अभिजात भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत याचा अप्रतिम मेळ साधणारे कार्यक्रम ऐकायला मिळणार आहेत.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, २३ जानेवारी(गुरुवार) रोजी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचे शास्त्रीय गायन ही संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. संदीप ऊबाळे, योगिता गोडबोले आणि सुनंदा राठोड यांचे मराठी सुगम संगीत देखील यावेळी होणार आहे. त्यानंतर २४ जानेवारीला(शुक्रवार) लुई बँक्स, जॉर्ज ब्रुक्स त्यांच्या सहका-यांच्या साथीने भारतीय आणि पाश्चात्य वादनाचे फ्युजन सादर करणार आहेत. तसेच श्रद्धा शिंदे यांचे कथ्थक आणि पवित्र भट यांचे भरतनाट्यम नृत्य होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २५ जानेवारीला(शनिवार) रसिकांचा लाडका गायक महेश काळे गायन सादर करणार आहे. तसेच लोकशाहीर रामानंद उगले यांचा महाराष्ट्राचा लोकरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. स्वरसागर महोत्सवातील हे सर्व कार्यक्रम निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर होणार असून दररोज सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम सुरु होतील. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून शरयूनगर मित्रमंडळ, प्राधिकरण यांचे या महोत्सवाला सहकार्य लाभले आहे.

याशिवाय स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून २२ जानेवारी रोजी स्वरसागर महोत्सवाच्या अंतर्गत सांगितिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात सुगम संगीत गायन, तबलावादन आणि हार्मोनियम वादनाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यासाठी पहिली ते दहावी हा एक गट व दहावी पुढील खुला गट असे दोन गट आहेत. प्रत्येक गटात सर्वप्रथम नोंद करणा-या २० स्पर्धकांनाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच दूरध्वनीवरुन वा इतर कोणत्याही प्रकारे प्रवेश दिला जाणार नाही. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 020 – 66333700 या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत संपर्क साधावा.

पिंपरी चिंचवडमधील संगीत रसिकांच्या मर्मबंधातील ठेव असे ज्याचे वर्णन करता येईल असा स्वरसागर महोत्सव यंदा २१व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने शहरातीलच नव्हे तर परिसरातील संगीत रसिकांसाठी दर्जेदार संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजवरच्या स्वरसागर महोत्सवात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी आपली कला येथे सादर केली आहे. ज्या आतुरतेने पुणेकर रसिक सवाई गंधर्व महोत्सवाची वाट पाहात असतात त्याच आतुरतेने पिंपरी चिंचवडचे रसिक स्वरसागर महोत्सवाची वाट पाहात असतात. या महोत्सवाच्या निमित्ताने एक वेगळा मानदंड निर्माण झाला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

मागील २१ वर्षांपासून शहरात सुरु असलेला स्वरसागर महोत्सव ही आपली सांस्कृतिक परंपरा आहे. येथे अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. यंदा देखील अनेक नामवंत कलाकार येथे येऊन आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. त्यामुळे स्वरसागर महोत्सवाला येऊन कलाकारांचे गायन, वादन, नृत्य याचा मनसोक्त आस्वाद घेऊन त्यांना भरभरुन दाद द्या असे आवाहन यानिमित्ताने गायक आणि या महोत्सवाचे समन्वयक महेश काळे यांनी रसिकांना केले आहे. तसेच पिंपरी चिंचवड नगरीची शान असलेल्या या महोत्सवाला आपण सर्व संगीत रसिकांनी आवर्जून उपस्थित लावून आम्हाला पसंतीची पावती द्यावी असे सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button