breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर, पुन्हा कडकडीत लॉकडाऊनची नगरसेवकांची मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.

माजी महापौर व विद्यमान नगरसेविका मंगला कदम, नगरसेवक बाबू नायर, भाऊसाहेब भोईर, नगरसेविका सीमा सावळे, सुलभा उबाळे यांनी पुन्हा लॉकडाउनची मागणी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अत्यंत चागले काम केले. 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळल्यापासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. 1 जूनपासून अनलॉक सुरु झाल्यानंतर रुग्णसंख्येतील वाढ सुरुच आहे. आठवड्यापुर्वी 150 ते 175 अशा सरासरीने रुग्णांची संख्या वाढत गेली.

मागील चार दिवसांत हे प्रमाण जवळपास दुपटीने म्हणजे 300 ते 315 च्या सरासरीने पुढे चालले आहे. ही शहरासाठी धोक्याची घंटा आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडेकोट शहर बंदचा निर्णय घेतला आणि तत्काळ त्याची अंमलबजावणी सुरू केली. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा एकदा कडेकोट शहर बंदचा निर्णय घेण्याची नितांत आवश्यकता आहे. नगरसेवकांमधून ही मागणी करण्यात येत आहे.

अन्यथा नागरिकांना उपचार देणे कठीण

माजी महापौर मंगला कदम यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढणार आहे, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सध्या बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिली, तर शहरातील खासगी तसेच सरकारी यंत्रणांवर अतिरीक्त ताण येऊन शहरातील रुग्णांना वैद्यकीय उपचार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात काही दिवस कडक संचारबंदी लागू करण्याची अत्यंत गरज आहे.

संसर्गाची साखळी तोडणे महत्वाचे

भाऊसाहेब भोईर म्हणाले की, लॉकडाऊन खुला केल्यापासून शहरात आता रुग्णांची संख्या 300 ते 325 च्या सरासरीने पुढे आहे. लोकांचा संपर्क वाढत चालला आहे. अवघ्या सात दिवसांत जवळपास 1300 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात वाढले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. पोलीस यंत्रणा, महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने हैराण केले आहे. आपले आमदार, नगरसेवक आणि त्यांची कुटुंब व कार्यकर्तेसुध्दा कोरोना बाधित झाले आहेत. अशा परिस्थितीत कोणी कोणावर नियंत्रण ठेवायचे हा प्रश्न आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवस कडक बंद करावा लागणार आहे.

कडक लॉकडाऊन करा

शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या की, शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. नागरिक घरात बसत नाहीत. आता पावसाळा चालू होत आहे. त्यामुळे सर्दी, ताप, थंडी आणि खोकल्याचे रुग्ण वाढणार आहेत. त्यामुळे कडक लॉकडाऊन करावा. नगरसेविका सीमा सावळे यांनी देखील शहर बंद ठेवण्याची मागणी केली आहे. तर, बाबू नायर यांनीही लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. तरच, शहरातील कोरोनाचा कहर थांबविण्यात आपल्याला यश येणार आहे. अन्यथा भीषण परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नायर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button