breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीय : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारात घणाघात

पोलीस आयुक्तांना सूचना दहशत माजवणाऱ्यांची हयगय करु नका

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात राज्यातील अगोदरच्या सरकाच्या आशिर्वादाने कायदा-सुव्यवस्थेची वाट लागली होती. त्यासाठीच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांतच पोलीस आयुक्त- जिल्हाधिकारी यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे शहरात दशहत माजवणाऱ्या कुणाचीही गय करु नका, अशा सूचना निवडणूक आचारसंहितेपूर्वीच दिल्या आहेत, असा घणाघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात प्रचार मेळावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, चांद्यापासून बांद्यापर्यंत कायदा आणि व्यवस्था व्यवस्थितच राहीली पाहिजे. यासाठी महाविकास आघाडी सरकार ठोस उपाययोजना करीत आहे. आपल्या आया-बहिनींची इज्जत सुरक्षित राहीली पाहिजे. कुणावरही अत्याचार होता कामा नये. सुरक्षित वाटले पाहिजे. त्यासाठी पोलीस दलाबाबत आदरयुक्त भिती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुभा दिली आहे. त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही.  

महापालिकेत बहुमताच्या जोरावर प्रस्ताव रेटण्याचा प्रयत्न…

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. बहुमताच्या जोरावर भाजपा सभागृहात काही विषय रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक ठिकाणी रस्ता ताब्यात नसताना कामे सुरू केली आहेत. त्याबाबत आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहिता संपल्यानंतर सूचना देणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर प्रत्येक आठवड्याला पिंपरी-चिंचवडमधील आढावा घेणार आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

…या निवडणुकीत कोणीही गहाळ राहू नका!

राज्यात पाच ठिकाणी विधान परिषद (पदवीधर आणि शिक्षक ) निवडणूक होत आहे.  नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या सर्व ठिकाणी महाविकास आघाडी एकोप्याने काम करीत आहे.  विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील सरकारची पहिली निवडणूक  आहे. पाचपैकी चार ठिकाणी अनुक्रमांक पहिल्या क्रमांकाला आपले उमेदवार आहे. अपवाद अमरावती मतदार संघ आहे. त्यामुळे मतदान करायला सोपे आहे. विरोधकांनी अरुण लाड नावाचे डमी उमेदवारही उभे केले आहेत. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी गहाळ राहू नये.  गेल्यावेळी अपयश आले  आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न राज्य सरकारशी संबंधित असतात. त्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीतील उमेदवारांना मदत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button