breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील महापालिका प्रशासन- खासगी डॉक्टरांमधील तिढा सुटला!

प्रभागनिहाय ‘सीसीसी’मध्ये सेवा बजावण्यास संघटनांची तयारी

आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थीने डॉक्टरांची सहकार्याची भूमिका

पिंपरी । प्रतिनिधी
महापालिका कोविड केअर सेंटरमध्ये सेवा बजावण्यासाठी ‘ओपीडी’बंद करुन किंवा अपेक्षीत मानधन मिळत नसल्यामुळे सेवा अधिग्रहणासाठी महापालिका प्रशासन आणि खासगी डॉक्टर यांच्या एकमत होत नव्हते. यावर आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त आणि डॉक्टर संघटना यांच्यामध्ये मध्यस्थी केली आणि अखेर संघटनांनी शहरातील ‘सीसीसी’मध्ये (कोविड केअर सेंटर) सेवा बजावण्याची तयारी दर्शवली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील वाढती कोविड-19 रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रशासन आणि खासगी डॉक्टर संघटना यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. त्यासाठी ओपीडी बंद करुन पूर्णवेळ महापालिका सेंटरमध्ये सेवा बजावण्यास डॉक्टरांचा नकार होता. तसेच, ठाणे महापालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही १ ते सव्वा लाख रुपयांपर्यंत मानधन मिळावे, अशी मागणी खासगी डॉक्टरांनी होती. दुसरीकडे महापालिका प्रशासन ३० ते ४० हजार रुपये इतके मानधन देण्याची तयारी दर्शवत होते. त्यामुळे ओपीडी बंद करून पूर्णवेळ ‘सीसीसी’सेंटरमध्ये सेवा बजावण्यास डॉक्टर नका र देत होते.
दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या उपस्थितीत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी असे सुमारे ४० जणांची गुरुवारी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटींग घेण्यात आली. यावेळी आमदार लांडगे यांच्या संकल्पनेतील प्रभागनिहाय कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा सुश्रृषा करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, ज्युनिअर डॉक्टर जे ओपीडी चालवत नाहीत, अशा डॉक्टरांना अपेक्षीत मानधनाची (60 ते 70 हजार प्रतिमहिना) तडजोड करुन सेवेत रुजू करण्यात येईल. तसेच, जे डॉक्टर ओपीडी चालवतात. त्यांना त्या-त्या प्रभागातील कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी करुन घेण्यात येईल. संबंधित प्रभागात ओपीडी चालवणारे डॉक्टर कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन विनामूल्य करण्याबाबत बैठकीत एकमत करण्यात आले. ही बैठक ‘फेसबूक’या सोशल माध्यमावर लाईव्ह करण्यात आली आहे.
डॉक्टर संघटनांची सहकार्याची भूमिका…
निमा संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सत्यजित पाटील म्हणाले की, आम्ही प्रशासनाला सहकार्य करण्याची संपूर्ण तयारी दर्शवली आहे. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी सुचवलेल्याप्रमाणे प्रभागनिहाय कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची रेग्युलर तपासणी आणि अन्य सुविधांसाठी आम्ही सहकार्य करणार आहोत. त्या-त्या प्रभागातील कोविड सेंटरमध्ये स्थानिक डॉक्टर स्वत:ची ओपीडी सांभाळून महिन्यातील एक दिवस पूर्णवेळ विनामूल्य सेवा देण्यास तयार आहोत.
आयुक्तांकडून डॉक्टरांना पूर्ण विमा सुरक्षाकवच…
शासकीय डॉक्टर किंवा कोरोना योद्धांप्रमाणे राज्य शासनाकडून देण्यात येणारे ५० लाख रुपयांचे विमा कवच खासगी डॉक्टरांनाही मिळावे, अशी मागणी डॉक्टर संघटनांच्या प्रतिनिधींची होती. यावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी डॉक्टरांना विमा कवचबाबतची मागणी मान्य केली. तसेच, महापालिका प्रशासनाकडून कोरोना योद्धयांना मिळणारी सर्व सुविधा संबंधित डॉक्टर्सना मिळवून देण्याची हमी आयुक्तांनी घेतली. तसेच, शहरात सुमारे १० हजार डॉक्टर्स आहेत. सर्वांनी सहकार्य केले, तर कोरोनाच्या संकटावर आपण मात करु, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला होता. तसेच, ‘वायसीएम’मधील कोविड सेंटरमध्ये ३० बेडचे व्हँटिलेटर सेंटर तयार आहे. पण, त्यामध्ये काम करणारा अनुभवी स्टाफ नाही. तसेच, नर्स, वॉर्ड बॉय असा सपोर्टींग स्टाफचीही कमतरता जाणवत आहे, असे कर्मचारी उपलब्ध करुन देण्यास डॉक्टर्सनी मदत करावी, असेही आयुक्तांनी आवाहन केले.
आमदार लांडगे- आयुक्तांनी डॉक्टरांसमोर हात जोडले…
शहरातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे आहेत. मात्र, तरीही डॉक्टरांच्या मागण्या आणि अपेक्षा मान्य करीत आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये डॉक्टर्स प्रतिनिधींना हात जोडून आवाहन केले. तसेच, आमदार महेश लांडगे यांनीसुद्धा सीमेवर ज्याप्रमाणे जवान देशाचे रक्षण करीत आहेत. तसे, शहरातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी डॉक्टरांनी पुढे आले पाहिजे, अशी विनंती केली. कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर्स संघटनांनी आमदार लांडगे आणि महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button