ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरीतील राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांचे निलंबन मागे – महापौर काळजे
पिंपरी: सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी सभागृहात गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत निलंबन केलेल्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे निलंबन मागे घेतले असल्याचे, महापौर नितीन काळजे यांनी आज (सोमवारी) सांगितले.
विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक दत्ता साने, मयुर कलाटे यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
पिंपरी महापालिकेच्या गुरुवारी (दि.20) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत 31 मार्च 2017 पर्यंतच्या सर्व अवैद्य बांधकामांना 100 टक्के शास्तीकर माफ करावा यामागणीसाठी राष्ट्रवादीने महापौरांपुढील हौद्यात धाव घेतली होती. सभा कामकाज रोखून धरले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौरांनी विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे तीन सर्वसाधारण सभेसाठी निलंबन केले होते.
शहराचा विकास करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. तसेच त्या नगरसेवकांनी निलंबन मागे घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे निलंबन मागे घेतले असल्याचे, महापौर काळजे यांनी सांगितले.
दरम्यान, महापौर काळजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात 20 एप्रिल ते 4 मे पर्यंत 15 दिवसांच्या कालावधीकरित नगरसेवकांचे निलंबन केले होते, असे म्हटले आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे तीन सर्वसाधारण सभेसाठी निलंबन केले होते. त्यामुळे महापौर काळजे यांनी नगरसेवकांचे निलंबन बेकायदेशीरपणे झाल्याचे अप्रत्यक्षरित्या कबूलच केल्याचे स्पष्ट होत आहे.