breaking-newsपुणे

पावसाळापूर्व तयारीसाठी 5 जून “डेडलाइन’

  • महापालिका आयुक्तांनी घेतली आढावा बैठक : 80 टक्‍के कामे पूर्ण झाल्याचा दावा
  • काम केल्याचे छायाचित्र लोकप्रतिनिधींना पाठवा

पुणे – शहरातील आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे 80 टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. उरलेली 20 टक्के कामे येत्या पाच जूनपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थान अणि शहरातील पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांचा प्रशासकीय आढावा बैठक महापलिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, राजेंद्र निंबाळकर, अहमदनगर, सातारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, महापालिकेचे सर्व विभागप्रमुख, शहर वाहतूक पोलीस प्रमुख उपस्थित होते.

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्यालय पुण्यात असल्यामुळे बैठकीच्या सुरूवातील जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. यानंतर शहरातील आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे आणि नालेसफाई याविषयीची माहिती बैठकीत घेण्यात आली. या बैठकीविषयी उगले आणि निंबाळकर यांनी माहिती दिली.

15 क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर यावर्षी पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यात आली आहे. या कामांचे छायाचित्र काढून ते लोकप्रतिनिधींना पाठवण्याचे आदेशही संबंधित क्षेत्रीय आयुक्तांना देण्यात आल्याचे निंबाळकर म्हणाले. सर्व क्षेत्रीय कार्यालयातील कामे अंतिम टप्प्यात असून, येत्या 5 जूनपर्यंत ती पूर्ण करण्यात येणार आहेत, असे उगले म्हणाल्या.

प्रशासनाची जय्यत तयारी
धोकादायक वाड्यांचा प्रश्‍न दरवर्षीच बिकट असतो. त्यामुळे अशा वाड्यांना नोटीसा देणे, पावसाळ्यामध्ये आवश्‍यक साधनसामग्रीची खरेदी तत्काळ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. जेथे तळी साठतात तेथे पाण्याचा निचरा होण्याची सिस्टिम या सगळ्या बाबींवर या बैठकीत चर्चा केली. पावसाळ्यामध्ये सिग्नल बंद पडून वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. तसेच विद्युत प्रवाहाच्या तारा तुटण्याचेही प्रकार होत असतात. यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि महावितरणलाही आवश्‍यक त्या सूचना दिल्याचे उगले म्हणाल्या.

रस्ते खोदकामास सर्वांनाच बंदी
महापालिकेच्या पथ विभागाने सुमारे 250 किलोमीटर रस्ते खोदण्यासाठी परवानगी दिली होती. 15 मेनंतर कोणत्याही कंपनीला रस्ते खोदण्याची परवानगी देण्यात आली नाही. कामे झाल्यानंतर खड्डे बुजवणे आणि रस्ते दुरुस्तीची जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील 6 किमी चे काम अजून शिल्लक असून ते 5 जूनच्या आत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन पथविभागाने दिल्याचे उगले म्हणाल्या. पावसाळी वाहिन्या, मलवाहिन्या, नाले सफाई यांचे कामही अंतिम टप्यात आली आहेत. 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारणार असून, महापालिका भवनात एक मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारणार असल्याचे निंबाळकर यांनी नमूद केले.

पावसाळ्यातील तक्रारींसाठी ऍप
पावसामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. याची तक्रार महापालिकेकडे करण्यासाठी स्वतंत्र ऍप तयार करण्यात येणार आहे. त्याविषयी महापालिकेच्या आयटी विभागाला सांगण्यात आले आहे. यामध्ये कमी शब्दांत, सोप्या पद्धतीने तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाहतूक नियंत्रण दिवे बंद असल्यास, किंवा पाणी साचले असेल, झाड पडले असेल किंवा अन्य काही तक्रारी असतील त्याचे छायाचित्र काढून, कोणत्या भागातील हा फोटो आहे याची फक्त माहिती या ठिकाणी भरून ती ऍपवर अपलोड केल्यास त्वरित त्याची दखल घेतली जाणार असल्याचे उगले यांनी सांगितले. याशिवाय येत्या काही दिवसात हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

रेडिओवरुन जनजागृती
शहरातील डिस्प्लेंवर वाहतूक कोंडी, पूर परिस्थिती, धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग, आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती देण्यात येणार आहे. तसेच आकाशवाणीसह सर्व एफएम रेडिओ यांनीदेखील महापालिकेच्या हेल्पलाइन कक्षाशी संपर्क करून याविषयीच्या सूचना आणि अलर्ट नागरिकांना द्याव्यात, असे आवाहन केल्याचे उगले म्हणाल्या.

जलसंपदा विभाग म्हणतो
जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीची माहिती दिली. धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग, त्यामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती, त्यामुळे बाधित होणारा भाग याविषयी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. तसेच शहरामध्ये ज्या भागात पावसाळ्यामध्ये पाणी शिरते, असे भाग शोधण्यात आले आहेत. याठिकाणी पाणी साचणार नाही अथवा तेथे राहणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतराची व्यवस्था, पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button