breaking-newsपुणे

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना

पुणे – आषाढी यात्रा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच वारकरी आणि दिंडी चालकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधांचा समाना करावा लागू नये, यासाठी पालखी मार्गावरील प्रत्येक पालखी मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला असून हे समन्वय कक्ष चोवीस तास सुरू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पालखी सोहळा समन्वय अधिकारी उदयसिंह भोसले उपस्थित होते.

पालखी मार्गावर पालखीच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक प्रांताधिकारी हे या समन्वय कक्षाचे प्रमुख व इन्सिडंट कमांडर राहणार असून तहसिलदार हे डेप्युटी इन्सिडंट कमांडर म्हणून काम करतील. या कक्षासाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्याची पुरेशा पोलीस कर्मचाऱ्यांसह नेमणूक करण्यात आली आहे. हे मुक्कामाच्या ठिकाणच्या कायदा व सुरक्षेची जबाबदारी पार पाडणार असून या संबंधिच्या तक्रार निवारणाचे काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

पालखी सोहळ्यात भाग घेतलेल्या वारकरी व दिंडी चालकांना असुविधांचा सामना करावा लागू नये तसेच त्यांना आवश्‍यक मदत मिळण्याच्या दृष्टीने या समन्वय कक्षात महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, पुरवठा विभाग, पोलीस विभाग, स्वच्छता विभाग, परिवहन विभाग, महावितरण विभाग या विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे समन्वय कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाच्या मार्गदर्शक सूचना तयार करून देण्यात आल्या आहेत, त्यानुसार काम करून पुर्तता करण्यात आली आहे का? याचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांच्याकडून मागविला असल्याचे भोसले यांनी सांगितले.

गॅस व केरोसीनचा मुबलक पुरवठा
पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांना गॅस व केरोसिनचा मुबलक पुरवठा व्हावा याची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने केली आहे. यासाठी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांना पासेस देण्यात आले आहेत. पासेस असणाऱ्या दिंड्यांना प्राधान्याने गॅस व केरोसीनचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पालखी मार्गावरील मुक्कामाची व विसाव्याच्या ठिकाणी अनधिकृत गॅस वापर होवू नये यासाठी तपासणी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर वारकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 78 टॅंकर देण्यात आले आहेत. त्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत 26 टॅंकर व संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये 46 टॅंकर, संत सोपानकाका पालखी सोहळा आणि संत चैतन्य महाराज पालखी सोहळा 1 असे 78 टॅंकर असणार आहेत. तसेच सासवड-फलटण-नातेपुते व माळशिरसपर्यंत पाणी देण्यासाठी नीरा उजव्या व डाव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येणार आहे.

130 ऍम्ब्युलन्स
पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना तातडीची वैद्यकीय मदत देण्यासाठी 130 ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही अहोरात्र आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत. खासगी रुग्णालयांमध्येही 10 टक्के खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; तर 2 अग्निशमन वाहने देखील तैनात करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button