breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पाणी वापराचे लेखापरीक्षण गरजेचे – जलसंपदामंत्री गिरीश महाजन

पुणे –  शहरासाठी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी पुणे महापालिकेकडून खडकवासला धरणातून उचलण्यात येते. हे अतिरिक्त पाणी नेमके जाते कोठे? त्या पाण्याचे काय होते, कोणी चोरी करते का? याबाबतची माहिती घेण्याचे काम पालिकेचे आहे. यासाठी महापालिकेने शहराच्या पाणीवापराचे लेखापरीक्षण करावे, अशी सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला शनिवारी केली.

महापालिकेच्या वतीने पर्वती जलकेंद्र येथे साकारलेल्या प्रतिदिन पाचशे दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात महाजन बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख विजय कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून अधिकाधिक पाण्याच्या पुनर्वापर कसा होईल, याकडे लक्ष द्यावे असे सांगून महाजन म्हणाले, खडकवासला धरणातून शहरासाठी अकरा टीएमसी पाण्याचा मापदंड ठरवून देण्यात आला आहे. प्रत्यक्षात पालिकेकडून साडेसतरा टीएमसी पाणी उचलले जाते. एका दिवसासाठी प्रतिव्यक्ती १५५ लिटर पाणी आवश्यक असताना ३३५ लिटर पाणी उचलले जाते. ही परिस्थिती पाहता अतिरिक्त पाण्याचा शोध पालिकेने घेणे गरजेचे आहे.

खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्र दरम्यानच्या सुरू असलेल्या बंदिस्त जलवाहिनीचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या जलवाहिनीमुळे पाण्याची गळती थांबणार आहे. खडकवासला ते पर्वती जलकेंद्र या दरम्यान बोगद्याद्वारे पाणी आणावे, अशी माझी संकल्पना आहे. आगामी काळात शहराच्या भल्यासाठी जलसंपदा विभागाकडून निश्चितपणे आवश्यक मदत करू. तसेच जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जागांवर होणारी अतिक्रमणे टाळण्यासाठी या जागांवर पालिकेच्या माध्यमातून खेळाची मैदाने आणि सायकल मार्ग विकसित करण्याबाबत पुढील आठवडय़ात बैठक घेऊ न निर्णय घेतला जाईल. खासदार शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महापौर मुक्ता टिळक यांनी केले. आभार उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button