breaking-newsआंतरराष्टीय

पाणबुडय़ांची घटती संख्या चिंताजनक

सागरी क्षमता वाढवण्यासाठी ५६ युद्धनौका आणि पाणबुडय़ांचा समावेश भारतीय नौदलात केला जाणार आहे, अशी घोषणा नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे जाहीर केले. असे असले तरी मुंबईमध्ये नौदल दिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी पाणबुडय़ा आणि पाणसुरुंगांचा शोध घेणाऱ्या युद्धनौकांच्या बाबतीत नौदलाची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचे सूचित केले.

पाकिस्तानसोबत १९७१ साली झालेल्या युद्धामध्ये कराची बंदरावर भारतीय नौदलाने चढविलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला पराभव मान्य करावा लागला. त्याच्या स्मृती जागविण्यासाठी प्रतिवर्षी या काळात नौदल सप्ताह साजरा केला जातो. नौदल दिनाच्या पूर्वसंध्येस नौदल प्रमुखांनी नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत भावी वाटचालीची माहिती दिली.

अ‍ॅडमिरल लांबा म्हणाले की, सागरी किनारपट्टीवर नौदलाची सतत देखरेख असून ५६ युद्धनौका व पाणबुडय़ा लवकरच नौदलात सामील होतील. त्याचप्रमाणे दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रस्तावाला वेग आला आहे तर तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचा प्रस्ताव तयार होत आला आहे, असेही ते म्हणाले.

नौदलप्रमुख लांबा म्हणाले की, सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी अडीचलाख मच्छीमार बोटींवर ओळख पटवणारे स्वयंचलित ट्रान्सपाँडर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिलायन्स नेव्हल इंजिनियरिंग लिमिटेड या कंपनीला पाच गस्तीनौका तयार करण्याचे कंत्राट देण्यात आल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही त्यावर विचार करीत असून या कंत्राटातील बँक हमीचे रोखीकरण करण्यात आले आहे.

सेशल्स येथे भारताचा नौदल तळाला घेण्यात आलेल्या आक्षेपाबाबत सध्या त्या देशाशी चर्चा सुरू आहे.तसेच मालदीव मधील परिस्थिती आता भारताला अनुकूल असून त्यामुळे सागरी सहकार्य वाढणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबई येथे आयएनएस कोची या युद्धनौकेवर नौदलाच्या पश्चिम विभागीय प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांची पत्रकार परिषद पार पडली. या मध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात लुथ्रा म्हणाले की, सध्या भारतीय नौदलाकडे केवळ १३ पाणबुडय़ा शिल्लक असून, त्यादेखील जुन्या होत चालल्या आहेत. दुसरीकडे नव्या पाणबुडय़ा नौदलात दाखल होण्याच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यालाही विलंब झाला असून दुसऱ्या टप्प्याची प्रकल्प अनुमतीही अद्याप झालेली नाही. या शिवाय पाणसुरुंगांचा शोध घेणाऱ्या युद्धनौकांचीही गरज असून, त्यांनाही विलंबच होतो आहे, ही सर्वच परिस्थिती थोडी चिंताजनक आहे. जुन्या झालेल्या पाणबुडय़ांचे आयुर्मान वाढवून त्यांचा वापर करण्याशिवाय सध्या तरी दुसरा पर्याय शिल्लक नाही. दोन पाणबुडय़ांची दुरुस्ती व नूतनीकरण करून आयुर्मान वाढविण्याचे काम सध्या सुरू आहे.

आयएनएस विराट संदर्भात अद्याप निर्णय नाही

आयएनएस विराट संदर्भात महाराष्ट्र सरकारने प्रकल्प अहवाल सादर केलेला असला आणि राज्य कॅबिनेटने मालवण जवळ संग्रहालय उभारण्यास मंजुरी दिलेली असली तरी ही विमानवाहू युद्धनौका कोणत्या राज्याला द्यायची याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी स्पष्टोक्ती पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल लुथ्रा यांनी केली. ते म्हणाले, याबाबत संरक्षण मंत्रालय लवकरच निर्णय घेईल. सध्या त्यावर २२५ नौसैनिक निवृत्त युद्धनौकेची काळजी घेण्यासाठी तैनात आहेत. तिच्या हस्तांतरणानंतरही युद्धनौकेच्या कर्तृत्वास साजेशा अशाच गोष्टींना त्यावर संग्रहालय थाटल्यानंतर परवानगी असेल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

महिलांचा नौदलातील सहभाग वाढणार

येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारतीय नौदलातील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी सुयोग्य आणि वेगात पावले उचलण्यास नौदलाने सुरुवात केली आहे, असे सांगून व्हाइस अ‍ॅडमिरल लुथ्रा म्हणाले की, सध्या कोणकोणत्या विभागांमध्ये महिलांचा सहभाग वाढविता येईल, याचा शोध घेतला जात आहे. त्याचप्रमाणे नव्याने कोणती कामे त्यांच्याकडून करून घेतली जाऊ शकतात, तेही पाहिले जात आहे. येणाऱ्या काळात लढाऊ रूपामध्येही काही विभागात महिला दिसू शकतात, असेही ते म्हणाले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button