breaking-newsराष्ट्रिय

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात बीएसाएफचे 4 जवान शहिद

  • “डीजीएमओ’नी शस्त्रसंधीचे पालन करण्याचे केले होते मान्य

  • असिस्टंट कमांडंट श्रेणीचा अधिकारीही हुतात्मा

  • काल रात्री सुरु झालेला गोळीबार पहाटेपर्यंत चालला

  • “बीएसएफ’कडूनही गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर

 

जम्मू – पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू काश्‍मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय ठाण्यांवर केलेल्या गोळीबारामध्ये सीमा सुरक्षा दलाचे चार जवान शहिद झाले. “बीएसएफ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

पाकिस्तानी रेंजर्सकडून काल रात्री सीमेवरील रामगड भागात गोळीबाराला सुरुवात झाली. त्यामध्ये “बीएसएफ’चे चार जवान शहिद झाले. त्यामध्ये असिस्टंट कमांडंट श्रेणीच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय अन्य तीन जवान जखमी झाले आहेत, असे “बीएसएफ’च्या जम्मू विभागाचे महानिरीक्षक राम अवतार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे पालन करायला पाकिस्तानी रेंजर्स आणि “बीएसएफ’ने मान्यता दिली होती. मात्र सीमेपलिकडून गोळीबार करून पाकिस्तानने या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने पावणे 10 च्या सुमारास केलेल्या या गोळीबाराला “बीएसएफ’च्यावतीने प्रत्युत्तर देत असताना असिस्टंट कमांडंट जितेंद्र सिंग, एसआय रजनीश, एएसआय रामनिवास, हवालदार हंसराज हे चौघेजण शहिद झाले. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे, असे “बीएसएफ’च्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
सीमेवरील रामगड भागात सीमेपलिकडच्या चामिलियाल ठाण्यावरून रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला गोळीबार पहाटे 4.30 वाजेपर्यंत सुरू होता, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. बीएसएफच्यावतीने पाकिस्तानच्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले गेले.

दोन्ही देशांच्या “डायरेक्‍टर जनरल मिलीटरी ऑपरेशन्स’नी 29 मे रोजी झालेल्या चर्चेमध्ये जम्मू काश्‍मीरच्या सीमेवरील चकमकी थांबवण्याच्या हेतूने 2003 सालच्या शस्त्रसंधी कराराचे शब्दशः आणि तत्वतः पालन करण्याला मान्यता दिली होती. तरिही या महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची ही दुसरी वेळ आहे.

3 जून रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी प्रागवाल, कानचाक आणि खौर भागात केलेल्या जोरदार गोळीबारामध्ये बीएसएफच्या सहायक उपनिरीक्षकासह 2 जवान शहिद झाले होते. त्याशिवाय 10 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये बहुतेक जण सर्वसामान्य नागरिक होते. आजच्या घटनेनंतर पाकच्या शस्त्रसंधी उल्लंघनात मरण पावलेल्यांची संख्या 50 झाली आहे. त्यामध्ये 24 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे.

पाकिस्तानकडून 15 मे ते 23 मे दरम्यान जम्मू, कथुआ आणि सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या जोरदार गोळीबार आणि उखळी तोफांच्या माऱ्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला होता. या गोळीबारामध्ये 12 जण ठार झाले होते. त्यामध्ये बीएसएफचे दोन जवान आणि एका नवजात बालकाचाही समावेश आहे. याशिवाय अनेकजण जखमीही झाले होते.

प्रथम गोळीबार न करण्याची दिली होती हमी 
दोन्ही देशांच्या “डीजीएमओ’नी एकमेकांशी चर्चा केल्यावर सीमेवर शांतता होण्याच्या आशेने या भागातील रहिवासी पुन्हा आपापल्या घरी परतायला सुरुवात झाली असतानाच आज नव्याने गोळीबाराला सुरुवात झाली आहे. 4 जून रोजी देखी सीमेवरच्या दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ऑक्‍ट्रोय ठाण्यावर 15 मिनिटे चर्चा झाली होती. त्यावेळी परस्परांच्या मनात विश्‍वास निर्माण करण्याबाबत एकमत झाले होते. सीमेवरील गोळीबाराला आपण सुरुवात करणार नाही, अशी हमी पाकिस्तानी बाजूकडून दिली गेली होती. तर “बीएसएफ’नेही केवळ चिथावणीच्या गोळीबारास प्रत्युत्तर देण्याचे मान्य केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button