breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसानं झोडपलं

सिंधुदुर्ग | तळकोकणात मान्सूनच्या दमदार आगमनाने सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धरण पहिल्याच पावसात भरून वाहत आहे. जिल्ह्यातील लघु धरण प्रकल्प असलेल्या माडखोल धरण यावर्षी पहिल्याच पूर्ण क्षमतेणे भरून वाहत आहे. सद्यस्थितीत 1.69 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. सावंतवाडी तालुक्यातील आतापर्यंत 615 मी मी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जात जलपुजन केले.

नाशिक
नाशिक जिल्ह्यातील येवला, लासलगाव, देवळा, सटाणा यासह ग्रामीण भागात भागात दुपारपासून जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी नदी-नाले ओसंडून.वाहत होते. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. परिणामी अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर येऊन ते दुथडी भरून वाहत होते तर ठिकठिकाणी शेतात पाणी तुंबले होते. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी बळीराजा मात्र सुखावला असून तो आता पेरणीच्या कामाला लागला आहे. तर येवला शहरात अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या मैदानावर भाजीपाल्याची दुकाने जोरदार पावसाने पाण्याखाली गेली.

यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात आज दुपारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. यामुळे नाल्यांना पूर तर काही शेतात पावसाचे पाणी सुद्धा साचले आहे. जिल्ह्याच्या पुसद आणि नेर तालुक्याच्या ग्रामीण भागात हा पाऊस कोसळला. पेरणी केली त्या भागात पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पाणी साचले तर कुठं शेती कामाची लगबग सुरू झाली आहे.

अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनने जोरदार हजेरी लावली. शिर्डीसह परिसरात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावलीय. शिर्डी, राहाता तसेच कोपरगाव तालुक्यात एक तास जोरदार पावसाने रस्ते, शेतशिवार जलमय झाले. तर ओढे नालेही तुडूंब भरून वाहू लागले. सखल भागात पावसाचे पाणी साचले. मान्सूनच्या पावसाने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. खरिपाची पेरणीयोग्य पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. एक तास दमदार हजेरी लावल्यानंतरही पावसाची संततधार सुरू होती. एकूणच यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाला असून बळीराजा मात्र शेतीच्या कामात व्यस्त झालाय.

बीड
बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेवराईमध्ये दुपारी सुरू झालेल्या तुफान बॅटिंग केलीय. जून महिन्याच्या मध्यावरतीच बीड जिल्ह्यामध्ये जवळपास दीडशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यात पेरणीला सुरुवात झाली असून कापूस लागवडी साठी शेतकरी लगबग करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

हिंगोली
हिंगोली जिल्ह्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. होत असलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शहरातील रस्त्यावर पाणी खळखळून वाहत होते. त्यामुळे नुकत्याच सुरु असलेल्या पेरण्या पुन्हा एकदा खोळंबल्या आहेत. त्याचबरोबर ओढे तुडुंब भरून वाहत असून, अनेक ठिकाणी नुकत्याच पेरणी केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचल्याचे चित्र बघायला मिळाले.

अमरावती
अमरावती जिल्ह्यात दोन दिवस समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. आज खासदार नवनीत यांनी नया अकोला गावी येथील शेतशिवारत पेरणीचा शुभारंभ केला. नया अकोला परिसरातील शेतकरी अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होते. गत दोन दिवसांपासून परिसरात कुठे रिमझिम तर कुठे दमदार पाऊस कोसळला आहे. आज नवनीत राणा नया अकोला येथील एका शेतशिवरत स्वतः पेरणी करून शेतकऱ्यांना यावर्षी चांगलं उत्पन्न व्हावं अशी प्रार्थना केली.

नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र मृग धारा बरसल्या आहेत. हा पाऊस म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते आणि गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्यात मृग नक्षत्राचा पाऊस सर्वत्र बरसला असल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी ला सुरुवात केली आहे. समाधान कारक असा पाऊस असल्याने ग्रामीण भागात पेरणीची लगबग दिसून येत आहे. येत्या दोन दिवसात नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आसल्याने पेरणीचा कामांना वेग आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button