पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची हजेरी
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.अचानक पावसाच्या हजेरीमुळे सर्वांचा गोंधळ उडाला. मात्र, उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला.
सांगली जिल्ह्यात सांगली शहर, तासगाव, मिरज आदी परिसरांत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सांगली आणि तासगाव तालुक्यात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. मराठवाड्यातील नांदेडमध्येही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला. दरम्यान, पुढील २४ तासांत मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.