breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पवारसाहेब चहावाल्याच्या नादी लागू नका – मुख्यमंत्री

पिंपरी – पवारसाहेब चहावाल्याच्या नादी लागू नका. नाहीतर पुन्हा एकदा धूळधाण होईल, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. मंत्रालयातील चहापानावर झालेल्या खर्चावरुन शरद पवारांनी भाजपवर टीका केली होती. शरद पवार यांच्या या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उत्तर दिले.

‘आम्ही चहा पितो. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या लोकांनाही आम्ही चहाच देतो,’ अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यापुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी पवारांना थेट इशाराही दिला. ‘पवारसाहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका. 2014 मध्ये उडालेली धूळधाण लक्षात ठेवा,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पवारांवर शरसंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवरही त्यांनी टीका केली. आधी राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपविरोधात सध्या विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. त्यावर भाष्य करत फडणवीसांनी विरोधकांवर शरसंधान साधले. ‘आधी एकमेकांविरोधात लढलेले अनेकजण आता एकत्र येत आहेत. शिकार दिसल्यावर लांडगे एकत्र येतात. तसेच आता सत्ता दिसल्यावर लांडगे एकत्र येऊ लागले आहेत. मात्र आमचा पक्ष हा सिंहांचा पक्ष आहे. आम्ही लांडग्यांना घाबरत नाही,’ अशा तिखट शब्दांमध्ये मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या टीकेलाही जोरदार उत्तर दिले. ‘फडणवीस हे वर्गाच्या मॉनिटरसारखे आहेत. मॉनिटर हा फक्त शिक्षकांचा आवडता असतो,’ अशी टीका राज यांनी केली होती. यावर बोलताना ‘मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे. माझा वर्ग रिकामा नाही. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, अशी माझी स्थिती नाही’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button