पिंपरी / चिंचवड

पवना नदी वाचविण्यासाठी लोकचळवळ उभी राहावी – गिरीश प्रभुणे

पिंपरी : ”पवना नदीचे पात्र पूर्वी स्वच्छ होते. जलपर्णी नव्हती. नागरिक नदीचे पाणी प्राशन करत होते. आत्ता मात्र नदीच्या पाण्यात पाय सुद्धा धुवावेसे वाटत नाहीत. एवढी नदीची गटारगंगा झाली आहे, अशी खंत क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे व्यक्त केली. तसेच पवना नदी वाचविण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
 ‘आपले चिंचवड व्यासपीठ’च्या पुढाकाराने ‘संकल्प पर्यावरण रक्षणाचा, उचलुया वाटा खारीचा’ या संकल्पनेतून  ‘नमामि पवनामाई’ अभियानाला शुक्रवार (दि.14) पासून सुरुवात झाली. त्यावेळी प्रभुणे बोलत होते. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे माजी मुख्य विश्वस्त विघ्नहरी देव महाराज, विद्या विघ्नहरी देव, खासदार श्रीरंग बारणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, गजाजन चिंचवडे, माजी नगरसेवक मधू जोशी, राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कृष्णाजी जगताप, संस्कृती संवर्धनचे अजित जगताप, मीना पोकर्णा, सुरेखा कटारिया, आशा काळे आदी उपस्थित होते.
 आपले चिंचवड व्यासपीठाने ‘नमामि पवनामाई’ अभियान सुरु केल्याने पवना नदीचे पात्र स्वच्छ होईल, असे सांगत प्रभुणे म्हणाले की, सर्वांनी एकत्र येऊन पवना स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनानेदेखील याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, पंरतु नागरिकांनी महापालिकेवरही अवलंबून राहू नये. पवना वाचविण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
 विघ्नहरी देव महाराज म्हणाले, चिंचवडगावाला ऐतिहासिक, धार्मिक महत्व आहे. पवना नदीचे पात्र स्वच्छ राहिले पाहिजे. आपले व्यासपीठने  ‘नमामि पवनामाई’ सुरु केलेले अभियान कौतुकास्पद आहे. सामाजिक चळवळीतून सर्वांनी एकत्र येऊन पवना नदीचे पात्र स्वच्छ करावे.
 दरम्यान, ”आपले पवनाकाठचे चिंचवड शहर ते महानगर’ या विषयावर गिरीश प्रभुणे आणि मधू जोशी यांची राजेंद्र घावटे यांनी प्रकट मुलाखत घेतली.
 संत तुकाराम महाराज व मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पवना नदीकाठी वसलेल्या चिंचवडगावाला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहे. पूर्वीचे वाडे, चाळी, वड, चिंचेची झाडे चिंचवडगावची मुख्य वैशिष्टये होती. तिर्थक्षेत्राला साजेशे असे चिंचवडगाव होते. चिंचवडमध्ये चतुर्थीला भरणारी यात्रा पाहण्यासारखी होती. यात्रेचे शहराला आकर्षण असायचे. शास्त्रीय संगीताच्या मैफिली होत होत्या, अशा विविध जुन्या आठवणींनाही प्रभुणे यांनी उजाळा दिला.
 मधू जोशी म्हणाले, पूर्वीचे चिंचवड रम्य होते. धूळ होती, पण ती धूळ हवी-हवीशी वाटत होती. वडाची, चिंचेची झाडे खूप होती. नगरपालिकेची नळाची योजना अस्तित्वात नव्हती त्यावेळी गावातील लोक याच पवना नदीचे पाणी पित होते. त्यावेळच्या नागरिकांमध्ये मतभेद होते, परंतु मनभेद नव्हते. खुनशीपणा नव्हता. आत्ता पूर्णपणे बदल झाला आहे. वाडे, चाळीच्या जागी सिमेंटची जंगले झाली आहेत.
 यावेळी  सुभाष चव्हाण यांनी ”पिंपरी-चिंचवड शहर उद्योगाचे माहेरघर” हा पोवाडा सादर केला. विघ्नहरी देव महाराज व सौ. विद्या देव यांच्या हस्ते ‘नमामि पवनामाई’ची महाआरती करुन  कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजाजन चिंचवडे यांनी केले. सूत्रसंचालन मानसी चिटणीस यांनी केले. तर, सुहास घुंबरे यांनी आभार मानले.
 कार्यक्रमाच्या संयोजनात सुहास डुंबरे, दुर्गेश देशमुख, दत्ता संगमे, महेंद्र चिंचवडे, सोमनाथ आलमखाने, महेश गावडे, नितीन हिरवे, अमित तलाठी, सविता इंगळे, सुरेज बेंद्रे यांनी पुढाकार घेतला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button