breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘पपा म्हणायचे, की दहशतवादाला धर्म नसतो..’

२६ नोव्हेंबर २००८च्या मुंबईवरील हल्ल्यात हेमंत करकरे धारातीर्थी पडले. त्यापूर्वी महिनाभर आधी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख या नात्याने त्यांनी २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी ११ आरोपींना अटक केली होती. त्यात एक आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरही होत्या. मालेगाव स्फोटातील बहुतेक सर्व जण ‘अभिनव भारत’ या संघटनेशी संबंधित होते. देशातील एका घातपाती कृत्यावरून प्रथमच एका हिंदुत्ववादी संघटनेचे नाव समोर आले होते. भाजपकडून गेल्या आठवडय़ात लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी ‘माझ्या शापामुळेच करकरे यांना मृत्यू आला’, असे वादग्रस्त विधान केले. त्यावर गदारोळ झाल्यावर ठाकूर यांनी माफी मागत करकरे हे शहीदच असल्याचे नमूद केले. या पार्श्वभूमीवर शहीद हेमंत करकरे यांची कन्या जुई नवरे यांच्याशी स्मिता नायर यांनी केलेली बातचीत.

  • २६ नोव्हेंबर २००८ला तुमच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी तुमच्यापर्यंत कशी पोहोचली?

मी बोस्टनला होते. नोव्हेंबरचा अखेरचा आठवडा होता. ‘थँक्स गिव्हिंग’चा जल्लोष वातावरणात भरून होता. अमेरिकेत हा सुटीचा काळ असतो. आम्ही अधिकच जोशात होतो कारण चुलत-मामे भावंडांना आम्ही घरी बोलावलं होतं. कुठे कुठे भटकायचाही प्लॅन होता. त्याप्रमाणे आम्ही घराबाहेर पडलो होतो. तेवढय़ात माझ्या बहिणीचा दूरध्वनी आला की, पपांनी बुलेटप्रूफ जॅकेट घातलं आहे अशी क्लिप टीव्हीवर दिसत आहे. मी लगेच घरी गेले. टीव्ही लावला. माझा नवरा, आई, भाऊ आणि बहिणीशी ‘कॉन्फरन्स कॉल’वरूनही बोलू लागले. मग टीव्हीतील दृश्यांखाली पट्टी दिसू लागली, ‘हेमंत करकरे जखमी’. मी म्हटलं, ठीक आहे. जखमीच आहेत.. त्या वेळी त्यांच्या मृत्यूचा विचारही मनात आला नाही. कुणी इतका टोकाचा विचार का करील? मग काही क्षणांतच पट्टी झळकू लागली.. ‘हेमंत करकरे यांना गोळ्या लागल्या..’ ‘करकरे यांच्या छातीत तीन गोळ्या घुसल्या..’ मी सुन्न झाले. आम्ही ‘कॉन्फरन्स कॉल’ही बंद केला. काही क्षण अस्वस्थ शांततेत सरले. मग माझ्या बहिणीचा संदेश आला. फक्त दोन शब्द होते.. ‘पपा गेले!’ मी तिला विचारलं, तुला इतकी खात्री का वाटते? ती म्हणाली, लोकांचे शोकसंदेश, सांत्वन करणारे फोन यायला लागलेत.. मग मी माझा ईमेल, फोन पाहिला. त्यावरही असे संदेश सुरू झाले होते. मग घराच्या ओढीनं विमानतळ गाठलं, तर कळलं मुंबईला जाणारी सगळी उड्डाणं दोन दिवसांसाठी रद्द आहेत. तशीच मटकन बसले. नियतीची परीक्षा संपली नव्हती तर.. दोन दिवसांत महाराष्ट्र सरकारकडून तिकिटं आली आणि २८ नोव्हेंबरचं विमान पकडून निघालो. घर गाठलं. आई अंथरुणाला खिळली होती. चेहऱ्यावर औषधांपायी    आणि आघातापायीचा थकवा होता; पण तरी आम्हाला पाहून ती क्षीणसं हसली. मी पपांच्या कपाटाकडे गेले. आदल्या दिवशीचा डय़ुटीवरचा त्यांचा सदरा नेटकेपणानं हँगरला होता. खिशात पेनही व्यवस्थित होतं. पपा आता कधीच परतणार नाहीत, ही तीव्र जाणीव बोचत होती. तशीच त्यांच्या पुस्तकांच्या कपाटाकडे गेले. हाती आली ती पुस्तकं वाचायला काढली. आजूबाजूच्या वातावरणात पुस्तकातले शब्द तरी सावरायला मदत करताहेत का, ते पाहायचं होतं.. मग ती अंत्ययात्रा.. मला अजूनही जशीच्या तशी आठवते.. ते विधी.. ती फुलं.. त्यांच्या पाíथवासोबत वाहत असलेला अगणित लोकांचा तो प्रवाह.. मी धक्क्यानं सुन्नच होते. अजूनही विश्वास बसत नव्हता. पपांचं पाíथव आम्ही पोहोचल्यावर घरी आणलं तेव्हा त्या थंड शरीराला स्पर्श केला तोच आठवत होता. मी त्यांच्या अचेतन चेहऱ्यावर हात फिरवत होते तेव्हा वाटलं, हे शरीर पपांचं आहे? उत्साहानं नेहमी रसरसलेल्या माणसाचं इतकं अचेतन शरीर! माझा विश्वासच बसत नव्हता. कुठल्याही मफलीचा ते जणू प्राण असायचे. चतन्याचा झराच असायचे. त्यांना त्या स्थितीत पाहावत नव्हतं.

  • त्या वेळी आलेले सांत्वनेचे संदेश आठवतात?

आमच्या कुटुंबासाठी जणू सहानुभूतीची लाटच आली होती. माझे पपा व्हिएन्ना आणि ऑस्ट्रियातही मुत्सद्दी अधिकारी म्हणून नियुक्त होते, त्यामुळे देशातूनच नव्हे तर जगभरातून अक्षरश: हजारो पत्रं आणि संदेश आले. ज्या कुणी त्यांच्याबरोबर अगदी थोडा काळ का होईना, काम केलं होतं त्यांनाही ते अगदी आपले निकटस्थच वाटत होते. हेमंत करकरे यांच्याबरोबर आपण काम केलंय, असा अभिमान प्रत्येकालाच होता. घरीसुद्धा माणसांची रीघ होती. पपा गेल्याच्या धक्क्यातून पुरती सावरली नसूनही माझी आई प्रत्येकाला एक कप चहा तरी दिला जातोय ना, यावर जातीनं लक्ष ठेवून होती. दोन पत्रं मला अगदी नीट आठवतात. एक त्यांच्या वध्र्याच्या प्राथमिक शाळेचं होतं. चौथीत ते त्या शाळेत पहिले आले होते आणि मग माध्यमिक शाळेत गेले होते. ते पोलीस अधिकारी असताना वध्र्याला गेले होते आणि त्यांच्या शिक्षकांना भेटण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते. त्यांच्या भेटीनं शिक्षकही भारावून गेले होते. मला त्या शाळेचं छायाचित्र पाठवण्यात आलं होतं. अगदी साधी शाळा होती. त्यांनी कळवलं की, आम्हाला तुमच्या वडिलांच्या नावानं ग्रंथालय सुरू करायची इच्छा आहे आणि त्याचं उद्घाटन आईनं करावं, अशीही त्यांची विनंती होती. दुसरं एक हृदयस्पर्शी पत्र होतं ते मालेगावच्या गावकऱ्यांचं. ते अगदी शैलीदार इंग्रजीत लिहिलं होतं आणि त्याच्यावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या होत्या. मी आजही ते जपून ठेवलंय. ती पपांना हृदयपूर्वक श्रद्धांजलीच होती.

  • तुमची आई कविताही करीत असे. तिच्या शेवटच्या काही वर्षांच्या काय आठवणी आहेत?

माझ्या आईला कविता करायला आवडायचं. पपा गेल्यावर वाटय़ाला आलेलं दु:खं पेलण्याचं बळ त्या कवितांनी दिलं होतं. तिचं नाव ज्योत्स्ना होतं; पण तिच्यातली काव्य करण्याची आवड लक्षात घेऊन पपांनी लग्नानंतर तिचं नाव कविता असंच ठेवलं होतं. त्या दोघांनाही पुस्तकं वाचायला आणि कवितांचा आस्वाद घ्यायला खूप आवडायचं. कुसुमाग्रजांच्या कविता एकत्रित वाचणं, हासुद्धा त्यांचा छंद होता. जगण्यातील सौंदर्याची त्यांना आवड होती. पपांच्या मृत्यूनंतर माझी आई खचून गेली होती आणि त्यातून सावरायला तिला खूप वेळ लागला. २०१४ च्या सुमारास तिनं तिच्या महाविद्यालयात शिकवायला सुरुवात केली. पोहायलाही जाऊ लागली. तिला स्वयंपाकाचीही आवड आहे.. ती पुन्हा हळूहळू का होईना पूर्ववत जीवन जगू लागली याचा मला अभिमान वाटतो. तिला अचानक मेंदूतील मज्जातंतू विस्फाराचा विकार जडल्यावर आम्हाला धक्काच बसला. तिची प्रकृती अगदी उत्तम होती; पण  पपांच्या मृत्यूनंतर ती खचली त्याचाही परिणाम होता.  पपांच्या मृत्यूनंतर सहा वर्षांतच आम्हा भावंडांचं आईवडिलांचं छत्र हरपलं. तिच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी सांगितलं की, तुम्ही अवयवदान करू शकता. आईचे डोळे खूप सुंदर आणि अतिशय बोलके होते. तेव्हा एकमेकांशी एक शब्दही न बोलता सगळ्यांनीच मूक होकार दिला आणि तिचे नेत्रदान करण्यात आले.  ज्यांना तिची दृष्टी मिळाली त्यांची भेट काही आम्हाला घेता आली नाही, पण आजही तिचे डोळे जिवंत आहेत, ही भावनाच मनाला सुखावणारी आहे. जरी तिच्या मृत्यूनंतरच्या या जन्मदानाचा आम्ही विचारही करू शकत नसलो, तरी..

  • आईवडिलांचं नसणं तुम्ही कसं पचवलंत?

मुंबई हल्ल्याच्या वेळी  पपा कोणतीही पूर्वतयारी न करता, काळजी न घेता गेले होते, असं तेव्हा काही लोक बोलत होते, पण मला ते पटत नाही. त्यांच्यासारखा माणूस असं वागू शकत नाही. मी विनिता कामटे हिची नेहमीच ऋणी राहीन. तिनं यामागचं सत्य शोधण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर केला. आता पपा आणि पोलीस नियंत्रण कक्षात झालेल्या संभाषणाचं ध्वनिमुद्रण माझ्याकडेही आहे. पपांनी त्या वेळी कामा रुग्णालयाभोवती वाढीव कुमक तातडीने मागवली होती. (याच रुग्णालयाबाहेर त्यांचा मृत्यू झाला.) काही कारणानं ती कुमक आली नाही आणि (लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अजमल) कसाब आणि इस्माईल खान फरारी झाले. मला नेहमीच आश्चर्य वाटतं की, त्यांचा अखेरचा आदेश का पाळला गेला नाही? काय कारण होतं त्यामागे? मी आजही ती ध्वनिफीत ऐकते. माझ्या पपांचा अखेरचा आवाज ऐकते. त्यांची अधिक कुमक पाठविण्याची विनंती ऐकते. लष्कराला पाचारण करा, असंही ते सांगताना ऐकते. त्यांच्यामागे गोळीबार आणि बॉम्बस्फोटाचेही आवाज ऐकू येतात. २६ नोव्हेंबरला रात्री ११ वाजून २८ मिनिटांचं त्यांचं ते अखेरचं बोलणं होतं.. ‘एटीएस आणि धडक कृती दलाची पथकं इथं हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला आहेत. क्राइम ब्रँचचं पथकही आहे. आता आम्हाला हॉस्पिटलच्या पुढच्या दाराशी कुमक हवी आहे. आम्हाला कामा रुग्णालयाला वेढा घातला पाहिजे..’ मला यातून आजही काही उमगेनासं होतं.. मी जेव्हा कुणा मुलांना फोनवरून आईवडिलांशी बोलताना पाहते तेव्हा जाणवतं, ही संधी आता आपल्याला नाही! मग मी परत परत त्यांचा तो शेवटचा आवाज ऐकते. वाटतं की चित्र वेगळंही होऊ शकलं असतं. खरं तर आम्ही आमचं दु:ख आमच्यापाशीच ठेवायचं ठरवलं होतं. या प्रकरणावरून अनेक वादंगही पसरवले गेले. त्यामुळेही आम्ही काहीच बोलू नये, असं ठरवलं होतं. माझे पपा सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते, पण आम्ही साधे नागरिक होतो. माध्यमांशी बोलायचा अनुभवही नव्हता. मी २७ वर्षांची होते, बहीण २१ आणि भाऊ १७ वर्षांचा होता. बाहेर जे काही वाद घातले जात होते त्यापासून आईलाही आम्हाला दूर ठेवायचं होतं. आता काहीही झालं तरी  पपा परत येणार नाहीत, हे आम्हाला माहीत होतं; पण माझ्या आईला माध्यमांशी बोलायचं होतं. ती एटीएस प्रमुखाची पत्नी होती. असे अनेक पोलीस शहीद झाले होते. त्यांच्या पत्नींना त्यांच्या हक्काचं ते मिळालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, ही तिची तळमळ होती. तिचं आईचं हृदय होतं आणि त्याच भावनेतून ती या महिलांचं नेतृत्व करत होती. पपांच्या मृत्यूनंतर जन्मलेल्या माझ्या मुलींसह मी मुंबईला एकदा आले होते. माझी मोठी मुलगी तीन वर्षांची तर धाकटी चार महिन्यांची होती, तेव्हा मी चार महिन्यांसाठी मुंबईत राहिले होते. मी त्यांना ताजमहाल हॉटेलशेजारी घेऊन गेले. त्यांना ताजची पेस्ट्री खाऊ घातली. याच भागांत मुंबई हल्ल्यात अतिरेकी आले होते. माझ्या पालकांविना हे शहर पूर्वीचं वाटतच नव्हतं. जुन्या आठवणी सतत समोर उभ्या राहात होत्या. केवळ माझ्या मुलांमुळे मी त्या धक्क्यातून सावरले. त्यांच्यामुळेच मी सकारात्मकतेनं काम करू शकले. माझ्या घरी पपांनी  त्यांच्या हातानं बनवलेली काही लाकडी शिल्पं आहेत. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून पोलीस पदक स्वीकारतानाचा त्यांचा एक फोटो माझ्या बोस्टनच्या घरातील दिवाणखान्यात आहे. माझ्या मुलींना त्यांचा हा वारसा समजावा, अशी माझी इच्छा आहे. जेव्हा मला त्यांची तीव्रतेनं आठवण येते तेव्हा मी त्यांचं विल्यम सॉमरसेट मॉमचं लघुकथांचं पुस्तक हातात घेते. माझ्या आईच्या कविताही मला जगण्याची ऊर्जा देतात. पपांच्या  मृत्यूनंतरची तिची एक कविता शहिदांवरही होती.

  • मुंबई म्हणताना तुमच्या मनात काय येतं? तुमचे वडील जिथं धारातीर्थी पडले ते शहर?

मुंबई म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येतं ते चौपाटीवर बांधलेली वाळूची घरं, ओहोटीच्या वेळी वेचलेले िशपले, जे मी भरभरून घरी नेत असे. माझ्या काकांच्या घरी त्यांचा खारवट वासाचा ढीग तोवर पडून राहायचा जोवर कंटाळून ते तो टाकून देत नसत. माझ्या बालपणातल्या या सर्व निरागस आठवणींना दहशतीच्या काळ्या सावलीनं झाकोळून टाकलं आहे.

  • वडिलांनी तुमच्याशी कधी मालेगाव प्रकरणाची चर्चा केली होती का?

त्या काळात त्यांच्याशी दोन मिनिटं बोलता येईल एवढीही त्यांना फुरसत नसे इतके ते त्या प्रकरणात बुडाले होते. माझ्या आईला त्या प्रकरणाची आणि त्यातून ओढवणाऱ्या परिणामांची चिंता वाटायची. लहानपणापासून मला ठामपणे वाटायचं की, माझे  पपा कधीच चुकू शकणार नाहीत. ते जेव्हा नक्षलग्रस्त चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक होते तेव्हा ते अत्यंत संवेदनाक्षम भागांत दूरदूपर्यंत जायचे आणि आदिवासींमध्ये विश्वास निर्माण करायचे. त्यांना काहीच होऊ शकणार नाही, असं मला वाटायचं. लहान मुलांनी वडिलांना सुपरमॅन, हिरो किंवा हीमॅन मानावं, तसं होतं ते. २६ नोव्हेंबरच्या त्या काळरात्रीपर्यंत माझी भावना तशीच होती. माझ्या आईला मात्र सतत त्यांच्या जिवाची काळजी वाटायची. ती मला दहशतवादी हल्ल्यांबद्दल वारंवार सांगायची. तो एका पत्नीचा ‘सिक्स्थ सेन्स’च होता म्हणा ना.. मी मात्र त्यांच्या कामगिरीला नेहमीच पाठिंबा द्यायचे. ते जे काही करतील ते योग्यच असेल, हे मला ठामपणे वाटायचं. ते कायद्यानुसार पावलं टाकणारे अधिकारी होते. एक मुलगी म्हणून मला त्यांची जवळून माहिती आहे. त्यांच्यासारखा माणूस न्यायासाठीच लढू शकतो. मी फक्त ते बोलत नसे.

  • मालेगाव स्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांची विधानं तुम्ही ऐकली आहेत का?

मी समाजमाध्यमांवर ती वाचली. त्यात माझ्या पपांचं नाव आलं म्हणून मी ते अधिक उत्सुकतेनं वाचलं. त्यात पपांचं नाव नसतं, तर कदाचित मी ते वाचलंही नसतं. त्यावरच्या विविध पातळ्यांवरून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियाही वाचनात आल्या. मला वाटतं, एकटय़ा हेमंत करकरेंचा नाही तर सर्वच शहिदांचा मान ठेवला गेलाच पाहिजे. ते अगदी रोखठोक स्वभावाचे होते. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी नेहमीच तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मग ती नक्षलवादाविरोधातली कारवाई असो की अमली पदार्थविरोधी मोहीम असो. नक्षलवादी भागांतही त्यांना वाटे, की गोळ्यांनी प्रश्न संपणार नाही. अविचारांचा नि:पातच आवश्यक आहे, असं ते मानत. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असं त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांच्या आयुष्यात आणि २४ वर्षांच्या पोलीस कारकीर्दीत त्यांनी प्रत्येकाला मदतच केली. मरणाच्या क्षणीही त्यांनी आपलं शहर.. आपला देश वाचविण्याचाच प्रयत्न केला. आपल्या गणवेशावर त्यांचं प्रेम होतं आणि आमच्याहून अधिक त्यांनी वर्दीलाच महत्त्व दिलं. प्रत्येकानं या गोष्टीचं स्मरण ठेवावं, असं मला वाटतं. मला प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानांवर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मला त्यांना किंवा त्यांच्या विधानांना महत्त्वही द्यावंसं वाटत नाही. मी फक्त हेमंत करकरे यांच्याबद्दलच बोलू इच्छिते. ते रोल मॉडेल होते आणि त्यांचं नाव अभिमानानंच घेतलं पाहिजे.

  • तुम्ही तुमच्या दोन मुलींना काय सांगता?

एकदा माझी आठ वर्षांची मुलगी शाळेतून एक पिंट्रआऊट घेऊन आली. त्यावर मार्टनि ल्युथर किंगच्या नातीनं त्यांचं छायाचित्र हाती उंचावल्याचा तो फोटो होता. त्याखाली लिहिलं होतं की, माझे आजोबा हिरो होते! मी माझ्या मुलीला म्हणाले, तुझे आजोबाही तितकेच मोठे हिरो होते. मी तिला पपांचे गणवेशातले फोटो दाखवले. ते अतिशय प्रसिद्ध पोलीस अधिकारी होते, खूप शूर होते, हे सांगितलं. काही बातम्यांच्या चित्रफितीही दाखवल्या; पण मी तिला दहशतवादी हल्ल्याबद्दल काही सांगितलं नाही. ती ते समजून घ्यायला अजून खूप लहान आहे. जेव्हा पापा व्हिएन्नात होते तेव्हा आमच्याकडे मुत्सद्दय़ांसाठीचा लाल पासपोर्ट होता. तो मी तिला दाखवला. मी तिला समजेल अशा गोष्टी दाखवत असते.

  • वडील म्हणून करकरे कसे वाटतात?

लहान वयापासूनच मी एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी होते. त्यामुळे सततच्या बदल्या होत. राज्यातल्या दहा शाळांमध्ये माझं शिक्षण झालं आहे. जेव्हा मी या बदल्यांबद्दल तक्रारीचा सूर आळवायचे तेव्हा  पपा म्हणायचे, यातूनच परिस्थिती स्वीकारायला तुला शिकता येईल. पुढे हे तुझ्या जीवनात खूप उपयोगी पडेल. लहानपणापासूनच मला जाणवलं होतं की, त्यांचं पहिलं प्रेम त्यांच्या सेवेवर आहे. मी त्या वेळी त्यांच्याशी बुद्धिबळ खेळत असे, पण त्यांना खूप कमी वेळ मिळायचा. तरीही महत्त्वाच्या प्रसंगी ते माझ्या पाठीशी असत. मग तो शाळेचा वार्षकि समारंभ असो.. एकदा मला आठवतं, वार्षकि समारंभ सुरू झाला तेव्हा ते एका महत्त्वाच्या बठकीत अडकले होते; पण जेव्हा माझं नाटुकलं सुरू झालं तेव्हा रंगमंचाच्या मागे माझ्या  पपांची उंच मूर्ती पाहून मी भारावले होते. लहानपणापासून माझ्या अवतीभवती पुस्तकंच पुस्तकं असत. एकदा पपांना ऑर्थर कोस्लरचं ‘द ट्रेल ऑफ द डायनासोर’ हे पुस्तक मिळालं. त्यात मृत्युदंड असावा का, याची चर्चा होती. कधी एखादा निष्पाप आरोपी नाहक जगण्याची संधी गमावून बसू शकतो, असा त्या पुस्तकातील विवेचनाचा रोख होता. आम्हाला सर्व तऱ्हेच्या पुस्तकांवर वैचारिक चर्चा करायला खूप आवडायचं. माझे  पपा अतिशय संवेदनाक्षम होते. ते सर्व बाजूंनी विचार करीत. माणसाला चूक सुधारण्याची संधी देण्यावर त्यांचा विश्वास होता. घरातल्या लहानसहान गोष्टींबद्दल ते आग्रही असत, मग तो पंधरा मिनिटांचा व्यायाम का असेना. आम्ही घराबाहेर पडायचो तेव्हा त्यांच्या सदऱ्यावर एकही चुणी नसायची. ते नेहमीच नीटनेटके असत. डोक्यावरचे केसही व्यवस्थित असत. तुम्ही कितीही व्यग्र असलात तरी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुम्ही वेळ काढलाच पाहिजेत, हे मी त्यांच्याकडून शिकले. अनेकांना माहीत नाही की त्यांना गृहसजावट करायला आवडायचं. त्यांच्यात ती सौंदर्यदृष्टीच होती. व्हिएन्नात जेव्हा त्यांची नेमणूक झाली तेव्हा त्यांनी अनेक सुशोभित वस्तूंचा संग्रह केला होता. त्यात कित्येक स्फटिकाच्याही होत्या. अशा वस्तू बनवणाऱ्या एका मोठय़ा फॅक्टरीचा पत्ता लागला तेव्हा ते हरखून गेल्याचं अजूनही आठवतं. अर्थात त्या महागडय़ा वस्तू ते विकत घेऊ शकले नाहीत, पण त्या पाहिल्याचाही आनंद होता. चंद्रपूरमध्ये असताना आपल्या हातांनी त्यांनी लाकडी शिल्पंही बनवली; पण त्यांचं खरं प्रेम पुस्तकांवरच होतं. त्यांचे वडील शिक्षक होते. लहानपणी ते रामकृष्ण मठाच्या वाचनालयात जात. वयाच्या आठव्या वर्षांपासून लागलेली ती सवय जन्मभर कायम होती. एकदा ते पुस्तक वाचण्यात दंग होते. वाचनालयाची वेळ संपल्यावर तिथल्या स्वामींनी ते बंद केलं. त्यांना कळलंही नाही की, एक मुलगा आत पुस्तक वाचत बसलाय. माझ्या आजीला मात्र खात्री होती. ती मठात गेली आणि मग स्वामींनी ते वाचनालय उघडलं. तेव्हाही  पपा खिडकीतून येत असलेल्या प्रकाशात पुस्तक वाचण्यात दंग होते! आपल्या मुलांनाही वाचनाची आवड असावी, त्यांनी जगातली उत्तमोत्तम पुस्तकं वाचावीत, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावं, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिलं. ‘अराऊंड द वर्ल्ड इन एटी डेज’ या पुस्तकावर आम्ही अनेक संध्याकाळ चच्रेत घालवल्या आहेत. त्यांचं दुसरं प्रेम मराठी पुस्तकांवर होतं. दोन्ही भाषांत मुलांनीही वाचनात पारंगत व्हावं, असं त्यांना वाटे. त्यांनी स्वत:चं जीवन स्वत:च मोठय़ा कष्टानं घडवलं होतं. आपलं आयुष्य पदोपदी संघर्षांनंच भरलेलं आहे, याची त्यांना तीव्र जाणीव होती, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button