breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पदवीधर मतदार संघ निवडणूक : चंद्रकांत पाटलांच्या संकूचित वृत्तीमुळे भाजपाचा पराभव!

पुणे मतदार संघात १२ वर्षे नेतृत्व करुनही सपाटून मार खाल्ला

पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला नवीन ‘मास लीडर’ची गरज

पुणे । विशेष प्रतिनिधी

पुणे पदवीधर मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीने सपाटून मार खाल्ला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकूचित वृत्तीमुळे मोठा पराभव सहन करावा लागला, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गेली १२ वर्षे नेतृत्त्व केले आहे. विशेष म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांची सूत्रे ही पाटलांच्या हातात असतात. मात्र, पक्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून एकही मराठा नेता (मास लीडर) तयार होवू नये. याची पद्धतशीर काळजी पाटील घेताना दिसतात. परिणामी, ‘हम करे सो कायदा’ या भूमिकेमुळे पक्षाची संघटनात्मक स्थिती ढासळली आहे.

राज्यात सहा मतदार संघामधील शिक्षक आणि पदवीधर मतदार निवडणुका झाल्या. पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. हा कोटा लाड पूर्ण केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.  पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवे लागले आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्त्व नाकारले आहे.

मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीचा फटका?

कोल्हापूरहून पुण्यातील कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांनी भाजपाचे पुर्नवसन केले. त्यासाठी तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले. त्याबदल्यात पुणे पदवीधर मतदार संघातून कुलकर्णी यांना तिकीट देण्याचे सूतोवाच स्वत: चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मात्र, पुणे पदवीधर मतदार संघातही कुलकर्णी यांना डावलण्यात आले. ही बाब पुणेकरांना रुचली नाही. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला नव्या चेहऱ्याची गरज…

विधानसभा निवडणुकांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला होता. ही परिस्थिती हाताळण्यात तत्कालीन सत्ताधारी असलेल्या चंद्रकांत पाटलांना अपयश आले. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना चंद्रकांत पाटलांनी गृहित धरले. परिणामी, विधानसभा निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ या भागात घटले आहे. कोल्हापूरमध्ये तर पाटलांना भोपळाही फोडता आला नाही. पुणे पदवीधर मतदार संघामध्ये पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा पाच जिल्ह्याचा समावेश होतो. या भागातील सुशिक्षित म्हटलेल्या मतदारांनीही पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत भाजपा आणि पर्यायाने चंद्रकांत पाटलांना डावलले आहे. त्यामुळे भाजपाला आता पश्चिम महाराष्ट्रात नवीन चेहऱ्याची गरज आहे, ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपा चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्त्वाखाली सपाटून मार खाणार, हे निश्चित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button