breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पत्रकबाजीपेक्षा खुल्या चर्चेला या- खासदार श्रीरंग बारणे

आमदार लक्ष्मण जगताप यांना आव्‍हान
पिंपरी- पत्रकबाजी करुन शहरवासीयांची करमणूक करण्यापेक्षा शहर विकासात काय दिवे लावले? याचे उत्तर देण्यासाठी खुल्या व्यासपीठावर चर्चेला या, असे आव्हान खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना दिले आहे. “सोशल मीडिया’तून भंपकबाजीपेक्षा विकास कामांकडे लक्ष द्या, वाल्हेकरवाडीतून काढता पाय घ्यावा लागला याचा विसर पडू देवू नका, असा खोचक सल्लाही खासदार बारणे यांनी दिला आहे.
मावळ लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासून राजकीय वातावरण तापू लागले आहे. मावळमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान आमदार जगताप यांनी खासदार बारणे यांना दिले होते. त्याला जगतापांचे आव्हान माझ्यासाठी शुभशकून असल्याचे सांगत खासदार बारणे यांनी 2015 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघात जगताप यांना पराभवाची धूळ चारल्याची आठवण करुन दिली आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या आमदार जगतापांनी बारणे यांची मावळचे, नव्हे तर “मावळते’ खासदार अशी संभावना केली. त्याचा खासदार बारणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आमदार जगतापांच्या बालिश प्रश्‍नाला उत्तर द्यायला. मी त्यांचा कार्यकर्ता नाही. माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्‍नाला आपण उत्तर दिले आहे. आपल्या भाजप प्रवेशाच्या अफवांच्या पुड्‌या सोडण्यामागचा खरा चेहरा जगतापांच्या पत्रकबाजीने उघड झाला आहे. आपल्याकडून लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पराभवाची माती खावी लागणार हे जगतापांना स्वप्नातही दिसू लागले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना न शोभणारी भाषा बोलू लागले आहेत. महापालिका निवडणुकीत मोटी लाटेचा फायदा घेत आयती सत्ता पदरात पडल्याने जगतापांना सत्तेचा उन्माद आला आहे. त्यातून त्यांनी रिंगरोडच्या नावाखाली गोरगरीबांच्या घरावर नांगर फिरवण्याचा घाट घातला. मात्र, वाल्हेकरवाडीत त्यांना पोलीस बंदोबस्तात पळ काढावा लागला. येथील नागरिकांनी त्यांना पिटाळून लावत सत्तेच्या उन्मादाला उत्तर दिले याचा विसर जगताप यांना पडला आहे. महापालिकेत सहा महिन्याच्या कारभारात अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांना वेठीस धरण्याखेरीज अन्य कोणतेही काम करु न शकलेल्या जगतापांचा ताप भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना होत आहे, हे पिंपरी-चिंचवडची जनता उघड्‌या डोळ्यांनी पाहत आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आपला विजय कसा झाला हे जगतापांनी स्वतःच्या अंतर्मनात झाकून पहावे. बोगसगिरीच्या आधारावर विजय मिळवल्याने राष्ट्रवादीला सोडून भाजपच्या वळचणीला जावे लागले, असा घणाघातही खासदार बारणे यांनी केला आहे.
——
मावळवासीय निर्णय घेतील!
आपण मतदार संघात कामे करत असल्यानेच आपल्या कामांना माध्यमांमधून प्रसिध्दी मिळत आहे. केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री आपल्याला विकास कामांसाठी सहकार्य करत आहेत. मात्र, त्यामुळे आमदार जगतापांचा तिळपापड होत आहे. प्रसिध्दी मिळवण्यासाठी त्यांचा आपल्यावर टीकाबाजी करण्याचा खटाटोप सुरु आहे. रोज उठून जनतेची करमणूक करण्याची माझी मानसिकता नाही. मावळच्या जनतेने आपल्याला विकास कामांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे आपण काय कामे केली आणि किती मार्गी लावली? हे मावळच्या जनतेला 2019 च्या निवडणुकीपूर्वी जाहिरपणे सांगू. त्यामुळे जगतापांनी राजकीय परिपक्वता दाखवून नगरसेवकपदाची 17 वर्षे आणि आमदारकीच्या 13 वर्षांचा लेखाजोखा खुल्या व्यासपीठावर आमने-सामने मांडावा. मीही 20 वर्षे नगरसेवकपद आणि तीन वर्षांच्या खासदारकीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडतो. त्यावेळेसच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा कोण उगवतो आणि कोण कायमचा बुडतो याचा निर्णय मावळची जनता घेईल, असे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button