breaking-newsक्रिडा

पंतसाठी विश्वचषक पात्रता परीक्षा

आज भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा एकदिवसीय सामना

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताची आघाडीची फळी धडपडत आहे. याशिवाय महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आल्यामुळे युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतसाठी उर्वरित दोन सामने म्हणजे विश्वचषक पात्रता परीक्षाच असेल. रविवारी होणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या मालिका विजयाप्रमाणेच पंतच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल.

विश्वचषकासाठी अपेक्षित असलेल्या सर्व खेळाडूंना संधी मिळण्याच्या दृष्टीने कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन प्रयत्नशील आहेत. याच उद्देशाने पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत अंतिम ११ स्थानांमध्ये काही बदल केले जाऊ शकतात.

धोनी रांचीमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील देशामधील अखेरचा सामना खेळल्याचे म्हटले जात आहे. कारण विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. त्यामुळे लंडनच्या विमानाचे तिकीट निश्चित करण्यासाठी पंतला नामी संधी चालून आली आहे. याआधीच्या सामन्यांमध्ये पंतचा निव्वळ फलंदाज म्हणून संघात समावेश केला जात होता. मात्र धोनीला विश्रांती दिल्यामुळे यष्टीरक्षणाची जबाबदारीसुद्धा त्याच्यावर असेल.

फलंदाजीची मदार कोहलीवर

आघाडीची फळी अपयशी ठरत असताना भारताच्या फलंदाजीची मदार कोहलीवर आहे. त्याने तीन सामन्यांत दोन शतकांसह एकूण २८३ धावा केल्या आहेत. सर्वाधिक एकूण धावांच्या यादीत मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव दुसऱ्या स्थानावर आहे. सलामीवीर रोहित शर्मालाही सातत्य टिकवण्यात अपयश येत आहे. त्याने तीन सामन्यांत एकूण ५१ धावा केल्या आहेत. याचप्रमाणे चौथ्या क्रमांकावरील फलंदाज अंबाती रायुडूलाही तीन सामन्यांत फक्त ३३ धावाच करता आल्या आहेत. सलामीवीर शिखर धवनला धावांसाठी झगडावे लागत आहे. तो तीन सामन्यांत फक्त २२ धावाच करू शकला आहे. विश्वचषकाच्या दृष्टीने धवन, रोहित आणि रायुडू या तिघांना दोन आंतरराष्ट्रीय सामने आणि आयपीएलमध्ये लयीत खेळण्याची संधी आहे. लोकेश राहुल भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहे. परंतु त्यासाठी धवन किंवा रायुडू यांच्यापैकी एकाला संघाबाहेर जावे लागेल.

भुवीचे पुनरागमन

रविवारी होणाऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळवता येईल. कारण पायाला झालेल्या दुखापतीमुळे मोहम्मद शमी उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. जसप्रीत बुमरासह नवा चेंडू हाताळण्यात शमी पटाईत आहे. महत्त्वाच्या क्षणी विजय शंकरनेही आपल्या मध्यमगती गोलंदाजीची उपयुक्तता सिद्ध केली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या खात्यावर तीन सामन्यांत सर्वाधिक ८ बळी आहेत.

झम्पाचे दडपण

कोहली आणि धोनी यांना बऱ्याचदा बाद करण्यात यशस्वी ठरणारा लेग-स्पिनर अ‍ॅडम झम्पाचे भारतीय फलंदाजांवर दडपण असेल. रांचीच्या तिसऱ्या सामन्यात झम्पाने ७० धावा दिल्या, परंतु मोक्याच्या क्षणी कोहली, धोनी आणि जाधव हे महत्त्वाचे फलंदाज बाद केले. मालिकेतील पुढील सामन्यांमध्ये आम्ही काही बदल करू. इंग्लंडमध्ये जाण्यापूर्वी खेळाडूंना सामना जिंकण्याच्या दृष्टीने तयार करण्यासाठीच हे बदल केले जाणार आहेत.   – विराट कोहली, भारताचा कर्णधार

लष्करी टोपी घालणाऱ्या भारतीय खेळाडूंवर कारवाईची पाकिस्तानची ‘आयसीसी’कडे मागणी

कराची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने लष्करी टोपी परिधान केली होती. या संदर्भात भारतावर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी रांचीतील सामन्यात लष्करी टोपी परिधान केली होती. याचप्रमाणे आपल्या एका सामन्याचे मानधन सैनिकांच्या कुटुंबीयांना दिले. ‘आयसीसी’ने भारतीय संघाच्या कृत्याकडे गांभीर्याने पाहावे, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत (यष्टीरक्षक).
  • ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, पीटर हँड्सकोम्ब, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, अ‍ॅश्टॉन टर्नर, झाये रिचर्ड्सन, अ‍ॅडम झम्पा, अँड्रय़ू टाय, पॅट कमिन्स, नॅथन कोल्टर-नाइल, अ‍ॅलेक्स कॅरे, नॅथन लायन, जेसन बेहरेंड्रॉफ.
  • सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजतापासून
  • थेट प्रेक्षपण : स्टार स्पोर्ट्स १
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button