breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींच्या विधानावरून वादंग

‘भ्रष्टाचारी हीच राजीव यांची अखेरची ओळख’

‘राजीव गांधी यांच्या जीवनाची अखेर भ्रष्टाचारी नंबर वन’ अशी झाली’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, विधानामुळे राजकीय वादळ उठले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि भाजपविरोधी पक्षांनी मोदी यांना लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड आणि बस्ती येथील प्रचारसभेत शनिवारी मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना राहुल यांचे वडील आणि माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. मोदी म्हणाले, ‘तुमच्या वडिलांची प्रतिमा त्यांच्या खूशमस्कऱ्यांनी ‘मिस्टर क्लीन’ अशी बनवली होती; परंतु तुमच्या वडिलांचा अंत ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणून झाला.’ मोदी यांचा रोख बोफोर्स खरेदीतील कथित भ्रष्टाचार आणि राजीव गांधी यांच्याकडे होता.

मोदी यांच्या या विधानावर वादंग माजले आहे. राहुल गांधी यांनी रविवारी मोदींना ट्वीट करून जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘मोदीजी, आता लढाई संपली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे. तुम्ही माझ्या वडिलांवर केलेला हल्लाही तुम्हाला वाचवू शकणार नाही’, असे ट्वीट राहुल यांनी केले आहे.

प्रियंका गांधी यांनीही मोदी यांच्या विधानाचा समाचार घेणारे ट्वीट केले आहे. त्या म्हणतात, ‘शहिदांच्या नावाने मते मागणाऱ्या पंतप्रधानांनी एका थोर शहिदाचा अपमान केला आहे. त्याबद्दल अमेठीचे लोक त्यांना साजेसे उत्तर देतील. राजीव गांधी यांनी आपले आयुष्य अमेठीसाठी दिले. मोदीजी, देश लबाडीला कधीच क्षमा करत नाही.’  काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांनीही मोदींवर टीका करणारी अनेक ट्वीट केली आहेत. ‘राजीव गांधी यांच्यावर टीका करून मोदी यांनी आपल्या मनातील नैराश्य आणि पराभवाची भीती व्यक्त केली आहे. मृत्यू झालेल्या माणसाबद्दल चांगले बोलावे या प्राचीन विचारांविषयी मोदींनी ऐकले आहे का? कोणताही धर्म मृत्यू झालेल्या माणसाची निंदा करण्यास परवानगी देतो का? राजीव गांधी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना निराधार ठरवून त्यांना निर्दोष ठरवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यास भाजपनेच नकार दिला होता, हे तरी मोदींना माहीत आहे का? मोदी काही वाचतात की नाही?’ अशा शब्दांत चिदम्बरम यांनी मोदींवर टीका केली.

मोदीजी, आता लढाई संपली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे. तुम्ही माझ्या वडिलांवर केलेला हल्लाही तुम्हाला वाचवू शकणार नाही.    – राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

शहिदांच्या नावाने मते मागणाऱ्या पंतप्रधानांनी एका थोर शहिदाचा अपमान केला आहे. त्याबद्दल अमेठीचे लोक त्यांना जशास तसे उत्तर देतील.     – प्रियंका गांधी वढेरा, सरचिटणीस, काँग्रेस

बोफोर्स प्रकरण : बोफोर्स तोफा खरेदीप्रकरणी १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर विरोधकांनी गैरव्यवहाराचे आरोप केले होते. विरोधकांनी या प्रकरणावरून रान उठवले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. राजीव गांधी यांची १९९१ मध्ये दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून हत्या केली. बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा एकही पुरावा नसल्याचे स्पष्ट करत दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व आरोप रद्दबातल ठरवले होते. उच्च न्यायालयाच्या या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यास त्या वेळी भाजपने नकार दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button