breaking-newsपिंपरी / चिंचवड

पंतप्रधान पिक विमा योजनेला मुदतवाढ द्या – मा. खासदार गजानन बाबर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यातील शेतक-यांसाठी पंतप्रधान पिक विमा योजनेची हप्ता भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात बाबर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत पंतप्रधान पिक विमा योजना यासंदर्भात शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलै 2020 पर्यंत दिली आहे. परंतु, आज राज्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना यासंदर्भात काही माहिती नाही, व संपूर्ण राज्यांमध्ये तालुकानिहाय याची जनजागृती होणे खूप गरजेचे आहे. वास्तविक पाहता पंतप्रधान पिक विमा योजनेमार्फत पिकाची पेरणी किंवा लावणी न होण्यामुळे होणारे नुकसान, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूसखलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड-रोग, नैसर्गिक आपत्ती, हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्‍चात नुकसान इत्यादी बाबींमुळे पीक उत्पन्नात घट झाल्यास पिक विमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा करता येतो.

यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन इत्यादींना प्रति दहा गुंठे, एकरी, हेक्टरी अतिशय कमी किमतीमध्ये विमा उतरवला जातो. यामध्ये प्रति दहा गुंठ्याला 70 ते 90 रुपये, प्रति एकराला 280 ते 365 रुपये व प्रति हेक्टरी 700 ते 900 रुपये असा विमा हप्ता घेतला जातो. परंतु, जर वरील प्रकारात शेतकऱ्याचे नुकसान झाले तर त्यांना प्रतिहेक्‍टरी 35000 ते 45 हजार 500 रुपये विमा संरक्षण दिले जाते. परंतु ,ही बाब अजूनही तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. तसेच, शासनामार्फत जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी विमा हप्ता भरण्याची मुदत वाढ 31 जुलै 2020 पर्यंत न ठेवता, ती वाढवण्यात यावी, जेणेकरून जनजागृती होण्यास वेळ मिळेल व सर्वसामान्य तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत योजना समजू शकेल व याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल.

तसेच, जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांना आपण योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आदेश द्यावेत. यासाठी विविध उपाययोजना राबवाव्यात, जनजागृती करावी जेणेकरून तळागाळातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेची माहिती पोचू शकेल. सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
सध्या आपले राज्य कोरोना साथीच्या प्रादुर्भावाने ग्रासले असून लॉक डाऊन किंवा अनेक केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या बंधनाने नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई आहे, याचाही परिणाम योजनेवर होतो. तरी, शासनाने गांभीर्याने विचार करावा, विमा हप्ता भरण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मुदत वाढ देण्यात यावी, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button