breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पंतप्रधान आवास योजनेचे भूमिपूजन ऑगस्टपर्यंत

पुणे- पंतप्रधान आवास योजनेतील घरांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन ऑगस्ट महिन्यापर्यंत भूमिपूजन करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. यासंदर्भात खासदार अनिल शिरोळे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची बुधवारी भेट घेऊन कामाचा आढावा घेतला.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, महापालिकेतील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरात सव्वासहा हजार घरे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्याप्रमाणात सदनिका उपलब्ध होणार आहेत. दहा लाखांच्या घरांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थींना साडेसात लाख रुपये बॅंकांकडून कर्जपुरवठ्याने उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिका समन्वय करणार असल्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.

यामधील परवडणाऱ्या घरांसाठी महापालिकेने हडपसर आणि खराडी या दोन ठिकाणी तीन हजार घरांचा प्रकल्प आराखडा तयार केला होता. त्याला राज्य आणि केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून, आता प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. त्यानंतर प्रशासनाने आणखी सव्वातीन हजार घरांचा आणखी एक प्रकल्प आराखडा तयार केला आहे. त्यात वडगाव खुर्द येथील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

त्यात पार्किंगसह दहा मजल्याच्या 9 इमारती उभ्या राहणार असून, त्यात 1 हजार 71 इतक्‍या सदनिका तयार होणार आहेत. उर्वरित 3 प्रकल्प हडपसर येथे 3 वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. त्यात हडपसर सर्व्हे नं. 76 याठिकाणी होणाऱ्या प्रकल्पात एकूण 16 इमारती उभ्या राहणार असून, त्यामधील सदनिकांची संख्या 1 हजार 904 इतकी आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी महापालिकेडे 41 हजार 700 अर्ज ऑनलाइन पद्धतीने आले होते. मात्र, त्यामध्ये कागदपत्रांसह प्रत्यक्षात फक्त 26 हजार 700 अर्ज दाखल झाले. यांची छाननी केल्यानंतर त्यामधील 7 हजार 800 अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता पात्र अर्जाची संख्या 18 हजार 800 इतकी शिल्लक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button