breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधानांकडून स्पष्टीकरणाची मागणी करीत विरोधकांचा सभात्याग

अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ

 नवी दिल्ली : काश्मीरप्रश्नी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कोणतीही चर्चा जपानमधील भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नव्हती. त्यामुळे काश्मीरप्रश्नी अमेरिकेला मध्यस्थी करण्यास सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी लोकसभेत दिले. त्यांचे उत्तर ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विरोधकांनी बुधवारीही सभात्याग केला.

मंगळवारी या मुद्दय़ावर संसदेत विरोधकांनी गोंधळ करून पंतप्रधान मोदी यांनीच निवेदन करावे अशी मागणी केली होती. त्यानंतर सभात्याग केला होता. राजनाथ सिंह यांनी सांगितले की, काश्मीरच्या मुद्दय़ात कुणालाही हस्तक्षेप करण्यास भारताने सांगितलेले नाही. कारण तो देशाच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे. काश्मीरप्रश्नी जूनमध्ये ट्रम्प व मोदी यांच्यात कुठलीही चर्चा झाली नव्हती. त्यामुळे ट्रम्प यांना मध्यस्थी करण्यास सांगण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. जेव्हा केव्हा भारताने पाकिस्तानशी चर्चा केली आहे तेव्हा ती काश्मीरपुरती मर्यादित नव्हती तर त्यात पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश होता.

अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी असा दावा केला होता की, पंतप्रधान मोदी यांनी जपानमधील चर्चेच्या वेळी त्यांना काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती केली होती.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर हे ट्रम्प व मोदी यांच्या ओसाका येथील भेटीच्या वेळी उपस्थित होते व  त्यांनीही याबाबत स्पष्टीकरण केले आहे व ते जास्त महत्त्वाचे आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दोन्ही सभागृहात असे सांगितले  होते की, पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांना काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास सांगितलेले नाही.

मोदी यांनी सभागृहात येऊन निवेदन करावे अशी मागणी प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेस व द्रमुक यांनी हौद्यात (सभापतींच्या आसनासमोरची जागा)  उतरून केली. त्यावेळी त्यांनी सतत घोषणाबाजी केली. त्यात सभागृहाचे कामकाज विस्कळित झाले.

शून्य प्रहरावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी  यांना बोलण्याची परवानगी दिली. सरकार जेव्हा त्यांच्या निवेदनास उत्तर देईल तेव्हा सभागृहात उपस्थित राहण्याची तंबी बिर्ला यांनी चौधरी यांना दिली. चौधरी यांनी सांगितले की, अध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सगळा देश गोंधळात पडला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या तोंडून आम्हाला याचे स्पष्टीकरण हवे आहे. कारण हे सगळे मोदी व ट्रम्प यांच्या दरम्यानच्या चर्चेत घडले आहे. मोदी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले तर त्यात चुकीचे काही नाही, पंतप्रधानांनी सभागृहात येऊन निवेदन करावे.

लोकसभेचे उपनेते व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह निवेदन करण्यास उभे राहिले असता काँग्रेस, द्रमुक व इतर सदस्यांनी सभात्याग केला.

त्यावर राजनाथ सिंह म्हणाले की, विरोधकांनी सरकारचे निवेदन ऐकण्याचे आश्वासन दिले होते पण त्यांनी सभात्याग करून आश्वासन मोडले आहे.

तत्पूर्वी प्रश्नोत्तराच्या तासाला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की,  परराष्ट्र मंत्र्यांनी निवेदन केले असल्याने यात आता संशयाला जागा उरलेली नाही. ‘प्राइम मिनिस्टर जबाब दो’ अशा घोषणा देत विरोधकांनी गोंधळ केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button