ताज्या घडामोडीपुणे

“नॅसकॉम’चे माजी अध्यक्ष किरण कर्णिक यांना जीवनगौरव

  • “मॅक्‍सेल’ पुरस्कारही जाहीर
  • उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पिंपरी – मॅक्‍सेल फाउंडेशनच्या वतीने उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “नॅसकॉम’चे माजी अध्यक्ष किरण कर्णिक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, यावेळी “मॅक्‍सेल’ पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
आर्थिक उदारीकरणाच्या काळात उत्पादनक्षेत्राबरोबर सेवा आणि तंत्रज्ञान आधारित उद्योगक्षेत्रातील संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या संधीचा फायदा घेण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. या स्पर्धेच्या युगात स्वत:ला कर्तृत्ववान म्हणून सिद्ध केलेल्या व्यक्‍तींना “मॅक्‍सेल ऍवॉर्ड’ने (महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्‍सलन्स ऍवॉर्ड) सन्मानित करण्यात येते. मॅक्‍सेल पुरस्कारांचे यंदा सहावे वर्ष आहे.
महाराष्ट दिनाच्या निमित्ताने यशदा, पुणे येथील सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतात टेलिकम्युनिकेशनची क्रांती घडविणारे व पॉलिसी मेकर सॅम पित्रोदा, मॅक्‍सेल अवॉर्डसचे सल्लागार जागतिक ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, “बोईंग इंडिया’चे दिनेश केसकर, शैलेश हरिभक्‍ती आणि मॅक्‍सेल फाऊंडेशनचे संस्थापक-विश्वस्त नितीन पोतदार आदी उपस्थित होते.
यावेळी भारतीय अवकाश संशोधन केंद्र (इस्रो) या संस्थेतेचे दोन दशकांहून अधिक काळ काम करणारे, नॅसकॉमचे माजी अध्यक्ष व “देशव्यापी शाळा वर्ग’ अशी या संकल्पना राबविणारे किरण कर्णिक यांना जीवनगौरव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे प्रमुख अशोक जैन यांना “एक्‍सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप’; डॉ. अविनाश फडके यांना भारतातील सर्वात मोठी डायग्नॉस्टीक लॅबोरेटरी चेन उभारल्याबद्‌द्‌ल “एक्‍सलन्स इन बिझिनेस लिडरशिप’, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषिक्षेत्रातील लौकीक मिळणारी पुण्याची शिवराय टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड यांना “मॅक्‍सेल अवॉर्ड फॉर’ एक्‍सलन्स इन इनोव्हेशन्स’ आणि घरगुती कॅशलेश व्यवहारासाठी उत्तम उपाय शोधणारे “आऊटगो पेमेंट’च्या चेतना पवार यांना “मॅक्‍सेल स्टार्ट अप अवॉर्ड’, तर पुण्याच्या चित्रा मेटे यांना “मॅक्‍सेल-एक्‍सलन्स’चा खास पुरस्कार देण्यात आला.
—-
मी महात्मा गांधींच्या विचारात वाढलो…
यावेळी सॅम पित्रोदा म्हणाले की, पुणे शहरात आलो हा माझा विशेष सन्मान आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना मी सलाम करतो. पुणे शहर हे बुद्धिवान लोकांचं शहर आहे.पुणे शहराशी अनेक आठवणी आहेत. माझे वडील पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला होते. मी परत जेव्हा शिकागोला जाईन तेव्हा त्यांना पुण्यातील फोटो दाखवीन. त्यांना खूप आनंद होईल. माझा जन्म ओरिसाच्या एका छोट्या गावात झाला आहे. पैसा कमवण हा माझा कधीच उद्देश नव्हता. कारण, मी महात्मा गांधी यांच्या विचारात वाढलो आहे, असे मत यावेळी सॅम पित्रोदा यांनी व्यक्‍त केले.
—-
“डिजिटल इंडिया’ संकल्पना राजीव गांधींची…
“डिजिटल इंडिया’ ही संकल्पना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आहे. “डिजिटल इंडिया’ची खरी सुरवात राजीव गांधी यांनी केली होती. पोलियो उच्चाटन मोहीमसुद्धा त्यांनीच सुरु केली होती. हे कोणालाच माहीत नाही. राजीव गांधींच्या जाण्यामुळे देशाचं नुकासान झालं ते तुम्ही विचार करता त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. ते असते तर आज वेगळा भारत दिसला असता, अशी खंतही सॅम पित्रोदा यांनी व्यक्‍त केली. तसेच, गेल्या 25 वर्षांत प्रचंड मोठ्या प्रमाणात मोबाईल वापरणाऱ्यांची वाढ झाली आहे. यांचं श्रेय तरुण उद्योजकांना आहे, तसे राजीव गांधी यांनाही द्यायला पाहिजे, अशी अपेक्षाही पित्रोदा यांनी व्यक्‍त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button